Mann Maze

Mann Maze

देव बघायलाय वरुन..

आमच्या गाववाल्यांनी एकदा सप्ता करायचा ठरवला.. सगळ्यांच्या वतीनं श्रीरंग तात्याला आयोजन कमीटीचा अध्यक्ष म्हणुन निवडलं...मारुतीच्या पारावर ...तात्या अन इतर दोघं-चौघं पट्टी गोळा कराया बसले...

दोन दिवसात मोजकी पट्टी जमा झाली..महाराज अन बुवा लोकाच्या तारखा ठरल्या..तेन्च्या सुपार्या बि ठरल्या...

पर शेवटच्या काल्याच्या किर्तनाला महाराज काय मिळंना...सगळे काला-स्पेशालिस्ट महाराज बिझी...मुश्किलीनं एक बुवा मिळाला...

सुपारीत बुवा काय अड्जस्ट करीना..कशी बशी सुपारी ठरली..

सगळे गावकरी तरुण-व्रदध मंडळी जोमानं तयारीला लागली..मंडप टाकला..महाराज लोकांना किर्तनासठी व्यासपीठ..बाहेरगावहुन येणार्या भक्तांना राहण्याची-जेवणाची सोय..सगळं काही एकदम व्यवस्थित.. तात्या पळापळ करुन जाम थकुन गेले...पण एक वेगळंच समाधान चेहर्यावर झळकत होतं....अन एकदाचा सप्ता सुरु झाला..वारकरी अन संप्रदायिक मंडळी नामरंगी दंगुन गेले...किर्तनात-भजनात...हरिपाठात... एकाचढीत एक किर्तन-प्रवचन-भजन-गवळणी-भारुड....पखवाज-टाळ-म्रदंग-पेटीचा सुर अख्ख्या पंचक्रोशीत दुमदुमला... बघता बघता सहा दिवस उलटले अन सातवा-काल्याचा दिवस उजाडला..

पंचक्रोशीतुन सकाळपसुन पब्लिक जमली.. क्रष्णाच्या बालपणीच्या लीला पासुन ते रासलीला ऐकण्यासाठी लोकांच्या मनात एकच उत्सुकता दाटली..गावकरी तरुण मंडळी प्रसाद-पाण्याची सोय करण्यात बेजार होउन गेली...किर्तनाचा टाईम उलटुन गेला.. महाराज काही लवकर येईना...उन्हात पब्लिक ताट्कळत बसली..तितक्यात..एकजन वरडला "महाराज आलं रय.."

बुवा टाटा सफ़ारीतुन उतरले..स्पेशल महाराजांसाठी असलेल्या खोलीत शिरले...बदाम-काजु युक्त दुध बुवांना देन्यात आले..नन्तर मिनरल वाटर...दोन-चार प्रकारची फ़ळं...

आयोजकाला-तात्याला बोलवुन महाराज आपला पंचा पुढं करुन म्हनले...

"सुपारी ठेवा"...

ठरल्यापेक्शा चार हजार कमी ठेउन तात्या म्हनाले.."महाराज, किर्तन संपल्यावर बाकिचे देतो..जरा पब्लिक वाढली म्हनुन प्रसाद करायला जास्त बजेट गेलं..तुमी किर्तन सुरु करा..म्या कायतरी अड्जस्ट करतो.."

बुवा एकाएकी पेटले..नोटाची बंडलं परत दिउन वरडले.."नालायक...मी किर्तन सांगनार नाही..माझ्या मुंबई-पुण्याच्या किर्तनाच्या दहा तारखा सोडुन मी इथं, असल्या खेड्यात आलो....एकदा किर्तन संपले कि कुनाला शोधु मी..सगळी सुपारी आत्ताच पुढे ठेवा नाहीतर मी निघालो.." बुवा ताड्कन उठले..

पब्लिक उन्हात करपुन निघाली... तात्या आणि इतर कमीटी मेम्बर्स महाराजाच्या हाता-पाया पडु लागले..पर बुवा काय ऐकायला तयार नाही....

महाराज किर्तन सांगणार नाही...एवढे लोक..एवढ्या लांबुन आलेले..एवढा सगळा प्रसाद.... तात्याला काय करावं काय नाही काय बी सुचंना....

तात्यानं खिशात हात घालुन चार हजार काढले अन बुवाच्या पुढे टाकले...बुवा खेकसले..,"आता कसे काय निघाले रे खिशातुन...चोरी करतो...नालायक कुठला...अरे देव पाहत आहे तुला….कर्मदरीद्री कुठला..." कमीटी मेम्बर्स आपसात कुजबुजु लागले..

तात्या कुत्सित हसले..अन म्हनले.."महाराज, माज़्या दोनी बी किडन्या फ़ेल झाल्यात...अन हे माज़्या पोरानं माज़्या गोळ्या औषधापायी पाठवलेले पैशे हाय्त..."

महाराज स्तब्ध उभा राहिले... तात्या म्हनले.."चला महराज किर्तन सुरु करा...लोक उन्हात बसलेत..अन देव बघायलाय वरुन….."


महेश

२३/०२/११


No comments:

Post a Comment