देव असतो. देव असावाच. पण तो आपापल्या मनात. त्याचा बाजार भरवू नये.
चमत्कार वगैरे सब थोतांड असते. देव पाहावा, मंदिरातल्या मूर्तीत नाही तर आपल्या आई-वडिलांमध्ये, आप्त-स्नेहीजनामध्ये! माणसातला देव ओळखता आला पाहिजे.
यावरून एक गोष्ट आठवली.
एक अगदी पुंडलीकासारखा नितांत भक्ती करणारा पांडुरंग भक्त असतो. तो संपूर्ण दिवस पांडुरंगाच्या नामस्मरणात घालवत असे. अन एक शेतकरी असे, जो कधी त्या मंदिरात जातही नसे, अन पूर्ण दिवस शेतात काबाड कष्ट करीत असे. एकदा खूप पाउस पडतो अन गावातील नदीला पूर येतो. पूर्ण गाव बुडते. सरकार तर्फे मदत कार्याची टीम पिडीताना सोडवण्यासाठी येते. सर्व लोकांना स्थलांतरित करण्यात येते. तो शेतकरी देखील त्यांच्या मदतीने स्थलांतरित होतो. पण तो भक्त मात्र पांडुरंगाचे समरन करीत मंदिराच्या शिखरावर जाऊन बसतो. पुराचे पाणी वाढू लागते. मदत कार्य करणारे त्याला खूप विनवतात पण तो म्हणतो, "मी एवढी पांडुरंगाची भक्ती करतो, आता तोच मला वाचवेल." खूप विनवणी करूनही तो ऐकत नाही. पुराचे पाणी वाढते, अन तो वाहून जातो आणि आपला प्राण गमावून बसतो.स्वर्गात गेल्यावर तो देवाला भेटाव आणि विचारतो, " देवा, त्या शेतकऱ्याने कधी मंदिरात पाय ठेवला नाही पण तू त्याला वाचवलेस, पण मी अख्हे आयुष्य तुझ्या चरणी घालवले, अन तू मला वाचवण्यासाठी का आला नाहीस?"
देव म्हणाला, "अरे मुर्खा, तुला विनवणी करणारा तो मदत कार्याचा अधिकारी मीच होतो. तुला त्याच्यामधला देव दिसला नाही. तुझी भक्ती हि अंध आणि दिखाऊ होती. उलट शेतकरी, रोज शेतात काम करत असताना त्याच्या मनात माझ्याबद्दल नितांत श्रद्धा होती. अन त्याने योग्य वेळी त्या माणसातला देव ओळखला."
तात्पर्य: देव कधी कुठल्या स्वरुपात दर्शन देयील सांगता येत नाही. फक्त देव ओळखण्याची कला तुमच्याकडे असायला हवी.
No comments:
Post a Comment