Mann Maze

Mann Maze

"माझी संगी..!"


दसऱ्याच्या सुट्टीसाठी गावाकडे निघालो होतो...दिल्लीहून मुंबईला फ्लाईट ने..तिथून पुढे गावाकडे बसने. तालुक्याच्या बस स्त्यांड वर गावाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत उभा राहिलो..तेवढ्यात समोर एक गोरी गोमटी/ सडपातळ पण संसाराच्या ओझ्याने थकलेली तरुणी-एक २ वर्षाचा छोटा मुलगा शेजारी व एक छोटी मुलगी काखेत घेऊन उभी असलेली दिसली...थोडे निरखून पाहिले....लक्ष्मण पवारांची संगीता ...."संगी"...."माझी संगी..!"

बारावीच्या परीक्षेला १च महिना राह्यला व्हता...मी बसने तालुक्याच्या कॉलेज ला जात व्हतो...माझ्या बरोबर गावातले १०-१२ पोरं अन ४-५ पोरी बी कॉलेजला बसने ये-जा करायच्या. त्या सगळ्यात पावराची संगी एकदम उठून दिसायची...अन मी बाबुराव पाटलाचा पोरगा "मुकुंदा"...खूप हुशार...अकरावीच्या परीक्षेत पहिला नंबर ४ मार्कांनी हुकला व्हता...बस मधी रोज ये-जा करता करता माझ्या ध्यानात आलं कि संगी सारखं माझ्याकडच बघत असती...येता-जाता...वर्गात, बाहेर, स्त्यांड वर...

मरीआईच्या जत्रमधी त्या गर्दीत मी दिवसभर देवळासमोर तिची वाट बघत बसलो..दिवस मावळायच्या टायमाला ती आली..मला देवीच दर्शन झाल्यासारखं वाटलं...मी लगेच उठून तिच्या मागं मागं देवळात शिरलो...पाठीमागून जावून तिचा हात धरला..ती थोडी घाबरली...तिच्या डोळ्यांत एकदा बघितलं अन एका झटक्यात तिला सांगून टाकल.."संगे..मला तू लय आवडतीस..." तीला काय बोलावे सुचेना..गर्दीत पकडलेला तिचा हात तिने लगेच सोडवून घेतला...अन काहीच बोलली नाही...दर्शन घेऊन बाहेर आली...मी पायऱ्यावर तिची वाट बघत बसलो होतो..जाता जाता म्हणाली.."चांगला अभ्यास कर..कॉलेज मध्ये तूच पहिला यायला पाहिजे.." हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं...तेवढं म्हणून ती दोन पावले पुढे चालू लागली...पुन्हा माघारी वळून बघून म्हणाली.."मला पण टू आवडतोस, मुकुंदा..." अन लाजून मागे वळून न पाहता निघून गेली...मला तर काय करावं काय नही काय काय कळना झालं...लगेच जावून देवीच्या पाया पडलो..

मग मी रंटून अभ्यास करायला सुरवात केली....रातदिन जागून..डोळ्यात तेल घालून..फक्त संगी साठी...परीक्षा सुरु झाली..पेपर मस्त गेले..शेवटचा पेपर व्हता...पेपर सुटला..मी कॉलेजच्या गेटजवळ संगीची वाट बघत उभारलो...उद्यापासून कॉलेजला सुट्ट्या...गावात एकमेकांना भेटणं खूप कठीण काम...तेवढ्यात संगी आली...मला बघून गालात हासली अन थोडी लाजली..मैत्रिणींच्या घोळक्यातून त्यांना कळू न देता ती वेगळी झाली आणि माझ्याकडे आली...थोडावेळ परीक्षेविषयी बोलून झाल्यावर मी तिला विचारलं...

"चल, आईस्क्रीम खायला जाऊ..."..

संगी-"मुकु, नको...बसची वेळ होईल..नाही जमणार.."

मी थोडावेळ विचार करून रात्री लिहिलेली एक चिट्ठी तिच्या हातात देऊन म्हणालो "घरी गेल्यावर एकांतात वाच.." आणि मग स्त्यांड कडे निघालो..

परीक्षा संपून ११ दिवस झाले...संगीची न माझी गाठभेट नाही...चिट्ठीत सांगितल्याप्रमाणे उद्या-रविवारी-दुपारी ३ वाजता माळावरच्या वडाखाली आमचं भेटायचं ठरलं व्हतं..

मी माळावर जाण्यासाठी निघालो..भर दुपारी..वाटेत जाता जाता धनगराचा महादू मेंढरं चारायालेला दिसला...मी त्याच्याकडे न बघताच जाणार तेवढ्यात बेण्यानं हटकलंच...."काय पाटील, दुपारच्या पाराला माळावर?"

साल्याच्या मुस्कटात हाणावी वाटली..."काही नाही महादू, असंच जरा फेरफटका मारायला निघालो..." असं सांगून झपझप चालता झालो...

माळावर खूप जुने चौफेर पारंब्या पसरलेले वडाचे झाड..मी झाडाखाली जाऊन उभा राहिलो..तेवढ्यात संगी एका पारंबी मागून बाहेर आली..

"काय रे मुकु, इतका उशीर? मी केव्हाची इथे येऊन वात बघत बसलीय.."

मग त्या वडाच्या झाडाखाली पुढचे दोन तास कसे गेले काय सांगू....खूप खूप बोललो...प्रेमाच्या, लग्नाच्या आणाभाका घेतल्या...डोळ्यांत डोळे..हातात हात...एकमेकांच्या मिठीत.....सगळं आयुष्य हा मुकुंदा त्या दोन तासात जगला...

"सोड आता, जावं लागेल...नाहीतर घरचे हुडकत बसतील मला.." काही वेळाने हळूच स्वत:ला माझ्या मिठीतून सोडवत संगी मला म्हणाली...इच्छा नसताना सुद्धा मी मिठी सोडली...मग ती जाताना दोघांच्याही मनात चलबिचल! मी आपला खाली मन घालून आभा होतो..तेवढ्यात संगी माझ्या गालावर हळूच तिचे लाल-गुलाबी ओठ टेकवून लगेच गावाकडे पळत सुटली....मला काही कळण्याच्या आत...मी नुसता तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहिलो...

कुणाला संशय येऊ नये म्हणून १५-२० मिनिटे तिथेच थांबलो..अन मग गावाकड निघालो..दिवस मावळतीला आला होता...मघाशी मेंढरं चारणारा धनगराचा महादू दिसत नव्हता..

मी आपला पुढच्या आयुष्याची स्वप्नं रंगवत घराकडं निघालो...गल्लीतून जाताना २-४ बायका मझ्याकड बघून कुजबुजताना मला दिसल्या..पण मी कानाडोळा करून थेट घराकडं निघालो..

घरी गेलो...आबा झोपाळ्यावर बसलेले...मला बघताच ताडताड मझ्याकड धाऊन आले....अन..काही कळायच्या आत....माझ्या मुस्कटात..पेकाटात...कमरेत..पाठीत...लाथा बुक्क्या...फोकाचे फटके..आई काही न बोलता ओसरीत दुरून पाहत उभी होती...धाकला गोविंदा अपराध्यासारखा पडवीच्या खांबाला टेकून तमाशा बघत होता...

मी बोंबलत होतो...आबा मारून थकले...शेवटी कळले...धनगराच्या महादूनं बोंब ठोकली होती...बेण्यानं आमचा प्रलय-प्रताप चोरून पाहिला होता...तडक उठून जाऊन त्याचा गळा दाबावा असं वाटू लागलं..

रडून रडून माझ्या डोळ्यातलं पाणी आटलं...मग मनाचा निर्धार करून मी बोललो..."माझा प्रेम हाय संगीवर...मला लगीन करायचंय तिच्यासंग..!"

आईनं ताडकन उठून माझ्या मुस्कटात हाणली...अन रडू लागली...! मी पुन्हा रडू लागलो...

मी शिकून आबाची कमविलेली सगळी इज्जत धुळीला मिळवली असं मला समजलं....मग थोड्या वेळानं मला मागच्या अडगळीच्या खोलीत कोंडून टाकलं...रात्रीचं जेवण गोविंदा तिकडच घेऊन आला..घास घेणार तेवढ्यात संगीचा बाप दारू पिऊन आमच्या दारात नाही तसल्या शिव्या देऊ लागला...लोक जमा झाले...आबा त्याला समजावून सांगत होते...हात जोडून माफी मागत होते...मला थोडं वाईट वाटलं..

दुसर्या दिवशी सकाळी आमचा मामा वाडीहून आला..मला मामासोबत वाडीला पाठवलं....१० दिवसात १२ विचा निकाल लागला...मला चांगले मार्क्स मिळाले..संगीचं काय झालं माहिती नाही...मामा लगेच मला सोलापूरला घेऊन गेला..इन्जिनिअरिन्गचा फॉर्म भरला..४ दिवसात लिस्ट लागली...माझा नंबर लागला..मग मामा मला माझ्या गावी घेऊन गेला..

गावात गेल्यावर समजलं...संगीच्या बापानं लासनगावच्या एका पेताड मास्तरासोबत तिचं लगीन लावून दिला होतं....मला वाईट वाटलं...दु:ख झालं..पण आता इन्जिनिअरिन्गला नंबर लागला होता..आता नवे स्वप्नं..नवी अशा..नवे आयुष्य..आता पुन्हा नव्याने सुरुवात करून आई-आबाचा विश्वास पुन्हा जिंकायचा असं ठरवून गाव सोडलं....इन्जिनिअरिन्गची चार वर्षे चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवून एका चांगल्या कंपनीत दिल्लीला चांगल्या पगाराची नौकरीही लागली...काळ गेला..वेळ गेली....त्यासोबत आठवणीही धूसर होत गेल्या...

तेवढ्यात बसचा भोंगा वाजला...मी भानावर आलो...संगी तिच्या लेकराला घेऊन बस मध्ये चढली...पाठोपाठ बिडी विझवून पेताड मास्तर कंडक्टरला शिव्या देत बस मध्ये चडले... अन मग मी चढलो...

संगीची ती अवस्था बघून मला तीचा अपराधी झाल्यासारखा वाटलं..

का मला आबानं त्या अडगळीच्या खोलीत कोंडला...अन का त्या लक्षमण पवारनं तिला त्या पेताड मास्तराच्या गळ्यात बांधला?

महेश.

१०/५/११

No comments:

Post a Comment