ऑक्टोबर महिन्यात माझ्या वडिलांवर "कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद" येथे मूत्रपिंड आरोपण (Kidney Transplantation) ची शस्त्रक्रिया झाली. हे हॉस्पिटल किडनी आरोपण, हृदय-विकार, क्यांसर यांसारख्या श्रीमंत रोगांवरील शस्त्र-क्रियेसाठी खूप संपूर्ण भारतात खूप प्रसिध्द आहे.
ऑपरेशन साठी १ महिना अगोदरच औरंगाबाद ला हॉस्पिटल जवळच एक फ्ल्याट भाड्याने घेऊन तिकडे राहायला गेलो. आठवड्यातून २ वेळा डायलिसीस करावे लागायचे. त्यामुळे हॉस्पिटल मध्ये नेहमी जावे लागायचे. आमच्या शेजारीच राहणारे (राहायला आलेले) शिंदे नावाचे एक "मराठा" शेतमजुरी करणारे कुटुंब (दारिद्र्य रेषेखालील) याच म्हणजे किडनीच्याच ऑपरेशन साठी औरंगाबादला आले होते. आमच्या अगोदर ६ महिन्यापासून ते इथे राहत होते आणि नियमित त्या पेशंटचे डायलिसीस करत होते. शिंदेच्या सर्व नातेवाईकांच्या किडन्या तपासल्या, पण त्याला कोणाचीच किडनी जमेना. ६ महिने उलटून गेले तरी कुणी डोनर मिळेना, आणि शेतमजूर असल्याने हा अफाट खर्च पण झेपवेना. पंतप्रधान निधीसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि पूर्ण निधी मंजूरहि झाला होता, पण निधी येण्यास अवकाश होता.
त्यांच्याच शेजारी, एक शेख "मुस्लीम" कुटुंब राहायला आले होते. पेशंट औरंगाबाद विमानतळावर सिनियर सिक्युरिटी ऑफिसर म्हणून सरकारी नौकरीत होता. त्यांना सुद्धा वर्ष भरापासून किडनी मिळत नव्हती. सर्वांच्या किडन्या तपासल्या. पण व्यर्थ. डोनर मिळेना. दररोज डायलिसीस केल्यामुळे प्रकृती एकदम खालावून गेली.
दोन्ही कुटुंब अगदी मोडकळीस आले होते. टेन्शन, धावपळ, पैसा, नातेवाईक, हे-ते काहीच काम करत नव्हते.
दोन्ही कुटुंबासमोर कुठलाच पर्याय नव्हता. तेव्हा डॉक्टरांनी एके दिवशी दोन्ही पेशंट आणि त्यांच्या पत्नी यांना बोलावून घेतले आणि सांगितले, "तुम्हा दोघानाही किडनी लवकर मिळणे शक्य नाही. आणि रोज डायलिसीस करून पेशंटचे हाल करण्यात काहीही अर्थ नाही. पण सुदैवाने तुमच्यापुढे एक पर्याय आहे. शिंदेच्या पत्नीची किडनी शेखला बसू शकते, आणि शेखच्या पत्नीची किडनी शिंदेला बसू शकते. तशा चाचण्या आम्ही केल्या आहेत. आणि सर्व रिपोर्ट पोझीतीव आले आहेत. कायद्याने आपण दोघांकडून तसे समती पत्र घेऊयात आणि आप्रेशन करून टाकूयात. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे."
डॉक्टरांच्या या सल्ल्याने दोन्ही कुटुंबासमोर एक आशेचा किरण समोर उभा राहिला. दोघांच्या पत्नीनी संमती दिली. कायद्याने त्यांच्या सर्वांच्या संमती-पत्रावर सह्या घेतल्या. एकाच दिवशी एकाच वेळी दोघांचेही ऑपरेशन करण्याचे मंजूर झाले.
दरम्यान शिंदेंचा पंतप्रधान निधी आला, आणि शेख यांना तर सरकारी नौकारदार असल्याने सर्व काही सरकारी खर्चातच होणार होते. त्यामुळे तोही प्रश्न मिटला.
माझ्या वडिलांच्या ऑपरेशनच्या आदल्या दिवशी त्यांचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. शिंदेच्या पत्नीची किडनी शेखला बसविली, आणि शेखच्या पत्नीची किडनी शिंदेला बसविली. महिनाभरात दोन्ही कुटुंब व्यवस्थित झाले.
विलक्षण योगायोग. एक गरीब दारिद्र्य रेषेखालील शेतमजुरी करणारे मराठा कुटुंब आणि एक श्रीमंत मुस्लीम कुटुंब. पण अशा वेळेस जात-धर्म, गरिबी-श्रीमंती अशा गोष्टीना काही किंमत नसते.
No comments:
Post a Comment