Mann Maze

Mann Maze

एक मजेशीर किस्सा.


मुरुड, लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर मागील २० वर्षापासून तालुका होता होता राहिलेले एक शहर वजा गाव. माझे बालवाडी ते १२ वी शिक्षण तेथेच झाले. मी १२ वीत असतानाचा एक किस्सा.
पावसाळा सुरु होता. मुरुड गावात डुकरांचा अगदी सूळसुळाट झाला होता. आम्ही मुरूडच्या त्या काळच्या (आणि आत्ताही) एकदम उच्चभ्रू समजल्या जाणार्या भागात राहत होतो. पण तो भागही त्या डुकरांनी सोडला नव्हता. डुकरांच्या टोळ्याच टोळ्या अख्या गावात धुमाकूळ घालत होत्या. नागरिक, दुकानदार, व्यापारी सर्वजण अगदी त्रासून गेले होते.
मुरुड गाव सुधारले असल्याने बहुतेक लोकांच्या घरी शौचालय बांधण्यात आले होते. आणि त्यामुळे उघड्यावर शौचास जाणारांची संख्या अगदीच कमी झाली होती. त्यामुळे डुकरांना त्यांच्या मुलभूत अन्नाची कमतरता पडू लागली असावी. शिवाय त्यात पावसाळा, पावसाने गावातली सगळी घाण वाहून गेलेली. त्यामुळे डुकरांचे भयंकर हाल होत असावेत. मग काय, डुकरे कधी कुणाच्या घरात शिरू लागली तर कधी कुणाच्या दुकानात!

एके दिवशी आमच्या भागात राहणारी एक मारवाडी महिला बाजारातून सामान खरेदी करून पायी चालत होती. तिच्याकडे सामानाने भरलेल्या २ पिशव्या होत्या. एका पिशवीत चुरमुरे होते. अन एका पिशवीत किरकोळ सामान.
बाई रस्त्याने चालत होत्या. डुकरांची एक टोळी आपल्या म्होरक्यासकट रस्त्याच्या कडेला दबा धरून बसली होती. मोका मिळताच टोळीच्या म्होरक्याने बाईवर हल्ला केला. चुरमुर्याची पिशवी तोंडात घेतली. बाई पुरती घाबरली. डुक्कर पिशवी ओढू लागले, पण बाई काय पिशवी सोडेना. बाई मोठ्याने ओरडू लागली, अन डुक्कर पण ओरडून त्याच्या साथीदारांना बोलावू लागले. त्यांच्या झटापटीत पिशवी फाटली. चुरमुरे रस्त्यावर सांडले. अन ते पाहताच डुकरांच्या टोळीने हल्लाबोल केला. बाई तूर्तास घाबरली, अन तिथून चालती झाली. डुकरांनी चुरमुर्यावर मस्त ताव हाणला.
दुसर्या दिवशी बाईने रागारागात ग्राम पंचायतीवर केस ठोकली का पंचायत समिती कडे तक्रार केली, असे काहीसे झाले. ४-५ दिवसात डुक्कर पकडणारी एक विशिष्ट जमात असते, त्यांना पंचायतीने डुकरे पकडण्याचे कंत्राट दिले.
अवघ्या १०-१२ दिवसात शेकडो डुकरे पकडली गेली. एक ट्रक भरून ती डुकरे मुंबईला पाठवण्यात आली असे काही विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
अशाप्रकारे त्या डुकरांच्या टोळ्या नंतर मुंबईतील मौंसप्रेमींच्या भक्षस्थानी पडल्या.

No comments:

Post a Comment