Mann Maze

Mann Maze

अनुत्तरीत प्रश्न!

⁠⁠⁠पावसाळ्याच्या पहिल्या वहिल्या रात्री, जेव्हा वर्षभर आसुसलेल्या त्या धरतीवर मेघराज खूष होऊन गडगडाट आणि विजा सोबतीला घेऊन जेव्हा बरसू लागतो तेव्हा अचानक एखादं कारण मनातल्या मनातच काढून धरतीने न सांगता त्या मेघराजावर रुसावं आणि मेघराजही आपलं काय चुकलं ह्या विचारात मग्न होऊन ते मिलन अधुरंच राहावं, ती रंगात आलेली प्रणयक्रीडा थांबावी  या पेक्षा वाईट दुसरं काय होऊ शकतं? एका क्षणात वातावरणातील तो गारवा, तो मृदगंध, तो गडगडाट आणि ती ऊर्जा नष्ट होऊन अचानक कैफल्य आणि नाराजीचा कोंदट वास सर्वत्र पसरतो, मनं कोमेजली जातात, विचारांचं थैमान सुरु होतं, कडूगोड आठवणींची इतिहास जमा झालेली स्मृतीपृष्ठे डोळ्या समोरून सरसर पालटली जातात!
त्यातल्याच एखाद्या काळाच्या ओघात निसटलेल्या आठवणीसोबत डोळ्यातून एखादा मोती निखळून उशीमधल्या मऊ कापसात त्या काळासारखाच जिरून जातो!
मध्यरात्र उलटून जाते, पहाटेची आस लागते, तरी डोळ्यांना झोपेचा सूर सापडत नाही, विचारांच्या लाटांना किनारा गवसत नाही!
हळूहळू रात्र सरत जाते, घड्याळाचे काटे निमूटपणे आकड्यांच्या भोवती फिरत वातावरणातील शांततेला भंग करत राहतात!
एव्हाना गरजणारे ढग आणि त्यातली ऊर्जाही नष्ट झालेली असते आणि सरत जाणाऱ्या रात्रीच्या मिठीत ती धरणीही निद्रिस्त झालेली असते!
हवेत उरलेली असते फक्त विरक्ती आणि डोळ्यांना लागलेली असते ओढ त्या जवळ येणाऱ्या पहाटेची!
विचारांचं थैमान थांबण्यासाठी ही रात्र सरून पहाट होणं फार गरजेचं होऊन बसतं!
अशा कित्येक रात्री कित्येकांच्या आयुष्यात कित्येक वेगवेगळ्या स्टोऱ्या पहाटेच्या हवाली करून  गुडूप झाल्या असतील, त्यातल्या कित्येक स्टोऱ्या शब्दांच्या कैदेत न अडकता या वातावरणातील प्रदूषित हवेत विरून गेल्या असतील आणि डोळ्यातून निसटलेले कित्येक खारट मोती त्या उशीने पिऊन टाकले असतील!
असे कित्येक पावसाळे येतीलही आणि जातीलही, मागे वळून पाहताना, थोडं बरसायचं राहूनच गेलंय याची खंत त्या मेघराजाला वाटत राहील का? आणि भरून आलेल्या ढगाखाली थोडं भिजायचं राहूनच गेलंय याची खंत त्या धरणीला वाटत राहील का?

अनुत्तरीत प्रश्न!!

No comments:

Post a Comment