Mann Maze

Mann Maze

नि:शब्द मी नि:शब्द ती

भाग १

औरंगाबादच्या शिक्षण बोर्डात आमची १५ दिवसांची ट्रेनिंग होती. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बरेच शिक्षक-शिक्षिका या शिबिरासाठी उपस्थित होत्या. आमच्या शाळेचा प्रतिनिधी म्हणून मी बीडहून रात्रीच औरंगाबादला पोहोचलो होतो. सकाळी ९ वाजता शिबिराचे क्लास सुरु होणार होते. तत्यापूर्वी नाश्ता-चहापाण्याची व्यवस्था केलेली होती. मी नाश्ता करून चहाचा ग्लास घेऊन एका कोपर्यात उभा राहून सर्व शिक्षक-शिक्षिकांमध्ये कुणी ओळखीचे भेटते का ते पाहू लागलो. आणि पाहता पाहता माझी नजर अचानक एका ठिकाणी अडखळली. २५ वर्षाची सडपातळ तरुणी, तेच स्मित हास्य, तेच टपोरे निळसर डोळे, काळे कुळकुळीत लांबसडक केस, चेहऱ्यावर अनामिक भाव! “अमृता, हो ती अमृताच, अजूनही जशीच्या तशीच सडपातळ, सुंदर!” एका वृध्द शिक्षिके सोबत बसून ती चहा घेत होती. तिला पहिले अन लगेच मनात आठवणींचे वादळ सुरु झाले. औरंगाबादहून मन लगेच रत्नागिरीला गेले.

मार्च संपून एप्रिल उघडला. माझी पोस्टिंग रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात (जिथे कि २ शिक्षकी शाळा होती) प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. शाळा २ शिक्षकी, पण सध्या तरी मी एकटाच तिथे होतो. दुसरी जागा २ महिन्यांनी भरली जाणार होती. एकटाच असल्यामुळे शाळेचा सर्व कारभार मीच पाहत होतो. १ ली ते ४ थी पर्यंत चे वर्ग फक्त २ चं खोल्यात सकाळ दुपार संध्याकाळ असे भरायचे. ४ वर्गात मिळून एकूण २५ च्या आसपास विद्यार्थी. संख्या कमी असली तरी ताण खूप होता. शिवाय रत्नागिरीतले ते लोक आणि त्यांची भाषा! माझी एकदम घुसमट होत होती. म्हणून मी नवीन येणाऱ्या त्या शिक्षकाची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होतो. त्यातल्या त्यात मला नकोसा वाटणारा पावसाळा सुरु झाला. आणि रत्नागिरीतला पाउस म्हणजे एकदम वैताग. सारखी रिपरिप...रिपरिप!

शेवटी तो सुवर्ण दिवस उजाडला! जिल्हा परिषदेचे पत्र माझ्या हाती पडले! अतिशय उत्सहाने उघडण्यास घेतलेल्या त्या पत्राने माझा सगळा उत्साह एका क्षणात हाणून पाडला! माझ्यासोबत रुजू होण्यासाठी नवीन येणारा शिक्षक नसून शिक्षिका आहे हे वाचून माझे तर त्राणच निघून गेले.

कु. अमृता वडगावकर, त्या युवतीचे नाव. आठवडा उलटून गेला. पाउस काही बंद होईना. बाहेर कुठे जायला वाव नाही. घरात बसून जीव घुसमटत होता. पावसामुळे शाळेत विद्यार्थी संख्याही कमीच. मग माझा पूर्वीचा छंद सुरु केलं- कविता करण्याचा!

मंगळवारी नव-शिक्षिका शाळेत रुजू होणार होती. मी आपला आता ती आल्यावर तिची राहण्याची-खाण्या-पिण्याची सोय ई. करण्यासाठी गावातील काही लोकांना सुचवले आणि तिच्यासाठी १ खोली पाहून ठेवली. सोमवारी सकाळी २ च्या वर्गावर तास घेत होतो. वर्गाच्या एका कोपर्यात ७-८ पोरं आणि २ पोरी बसलेल्या. इतर तीनही कोपर्यात पाणी गळत होतं. पावसाचा जोर वाढलेला. छपरावरती पडणाऱ्या पावसाचा आवाज येत होता. आणि दारात पन्हाळातून पडणाऱ्या पाण्यामुळे बाहेरचं काही दिसत नव्हतं.

तितक्यात, “पाटील सर्” म्हणून कुणीतरी हाक दिली. मी बाहेर न पाहताच म्हणालो, “तास संपल्यावर घेऊन जा हो पोराला.” आणि पुढे शिकवू लागलो. पुन्हा तीच हाक, यावेळी मला जाणवले कि हा महिलेचा आवाज आहे. आणि मग पाण्याच्या पडणाऱ्या पन्हाळातून थोडासा कटाक्ष बाहेर टाकून मी पाहतच होतो तर एक युवती आत मध्ये आली. मी जागेवरच थबकलो आणि काही न बोलता अवाक होउन तिच्याकडे पाहू लागलो. तिने माझ्याकडे फारसे लक्ष न देता हातातली ब्याग खाली ठेवली आणि पदराने आपला भिजलेला चेहरा कोरडा केला. पर्स मधून काहीसे कागद काढून माझ्या पुढे दाखवत ती बोलली, “मी अमृता, आणि हे माझे अपोइंत्मेंत लेटर.” मी काही न बोलता ते तिच्या हातातून घेतले आणि वाचत असल्याचा बहाणा करून चोरून तिच्यावर एक तिरपा कटाक्ष टाकणार तेवढ्यात, “स्टाफ रूम कुठे आहे?” ती. “हीच स्टाफ रूम आहे” मी. ती अवाक!

गुलाबी रंगाची साडी तिच्या कमनीय देहाला अगदी शोभून दिसत होती, आणि पाठीपर्यंत मोकळे सोडलेला तिचा केश संभार तिच्या यौवनाची शोभा द्विगुणीत करत होता. क्षणभर माझा सगळा वैताग पावसाच्या वाहत्या पाण्या बरोबर वाहून गेल्यासारखं मला वाटलं.

मग मी मुलांना, “ये पोरानो, जा रे घरी, उद्या या आता”असे बोलून शाळा सुट्टी केली. शाळेच्या खोलीची ती दयनीय अवस्था पाहून अतिशय जिद्दीने मुलांना शिकविण्याचा वसा घेतलेल्या त्या आधुनिक सावित्रीबाईच्या चेहऱ्यावर आलेली निराशा माझ्या डोळ्यांनी क्षणही न दवडता टिपली. तिच्या भिजलेल्या देहावर माझी नजर क्षणभर थिजली आणि हे तिच्या चाणाक्ष डोळ्यांनी क्षणही न दवडता टिपले, आणि आपला पदर सावरत बोलली, “शी, हि शाळा आहे?”

मी, हात मोडलेली दुसरी खुर्ची तिच्या पुढे सरकवत बोललो, “तू, आय मीन, तुम्ही उद्या येणार होतात न?”

“अहो पाटील सर्, तुम्ही तुम्ही काय करताय? माझे नाव अमृता आहे”, आणि थोडे लाजून खुर्चीवर बसत पुढे बोलली,”मला अमृता म्हणूनच हाक मारा!” मला जरा शरमिंदा झाल्यासारखं वाटलं.

“माझी जोईनिंग उद्याचीच आहे, पण अगोदर येऊन रूम ई. शोधावी म्हणून आजच आले. पाउस उघडला कि जाऊ या आपण बाहेर. मी इथे नवीन आहे, मला रूम शोधण्यास थोडी मदत करा.” आता रत्नागिरीचा पाउस एकदा सुरु झाल्यावर पुन्हा थांबतो का? आणि हे या सुंदरीस कोण सांगणार? मग मीच बोललो, “अमृता, हा पाउस अजून ४-५ दिवस थांबणार नाही, चल आपण निघूया, मी तुझ्यासाठी रूम पाहून ठेवलीय!” माझे हे वाक्य ऐकून तिला माझा थोडा आधार वाटला असावा, (अर्थात तो भाव मी तिच्या चेहऱ्यावर पाहिला, तसं तर तिच्या चेहऱ्यावरचा एकही भाव माझ्या नजरेने टिपण्याचा सोडला नाही!)

निघालो तर खरं, पण माझ्याकडे एकच छत्री तीही एक काडी मोडलेली! पण ती काही बोलली नाही, तिला मदत म्हणून तिची एक ब्याग मी उचलली, आणि चिखलातून वाट काढत दोघेही चालू लागलो. आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीच्या खांद्याला खांदा लावून चालत होतो, तेही एका छत्रीत! ती भिजू नये म्हणून अर्ध्या पेक्षा जास्त छत्री मी तिच्या वरती धरली, माझी एक बाजू पूर्णपणे भिजून गेली. रत्नागिरीला आल्यापासून पहिल्यांदाच पाउस बंदच होऊ नये असं वाटलं!

तितक्यात समोरून अप्पा सावंत सायकलवरून पुढून येताना दिसले, आम्हाला पाहून सायकल वरून उतरून बोलले, “काय पाटील गुरुजी, सगळा बारदानाचं घेऊन आलात म्हणा कि!” असे बोलून पुढे लगेच बोलले, “ नमस्कार वाहिनी, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे तुमचा!” आणि निघून गेले. माझी तर बोलतीच बंद! तिच्याकडे पाहायची तर हिम्मतच होईना. “काय लोक असतात, विचारपूस न करताच काहीही तोंडाला येयील ते बोलतात!” इति मी. ती काहीच बोलली नाही, नुसतीच गालातल्या गालात हसू लागली. शेवटी तिच्या खोली जवळ आम्ही पोहोचलो. घर मालकाशी भाडे ई. गोष्टी ठरवून, खोली उघडून समान आतमध्ये ठेवले आणि बाहेर येऊन उभा राहिलो. “पाटील सर्, असे बाहेर का उभे आहात? आत या ना!” मला जरा अवघडल्या सारखं झालं. मी आत गेलो, खुर्चीत बसलो, तितक्यात घर मालकिणीने चहा आणून दिला. चहा पिऊन झाला, कुणीच काही बोलेना, मग मीच सगळी शक्ती एकवटून त्या भयाण शांततेला मोडीत बोललो, “मला पण पाटील सर् नको म्हणूस, माझे नाव शरद आहे. आणि मलाही फक्त शरदच म्हणून हक मारलेलं आवडेल! आणि मघाशी ते अप्पा जे काही अनावधानाने बोलले त्याबद्दल सॉरी!” ती नुसते गालात हसली आणि विषय बदलत बोलली, “शरद, किती छान नाव आहे नाही?” मी नुसता हसलो.

तिची अवघडलेली अवस्था पाहून माझ्या नंतर लक्षात आले, तिलाही भिजलेले कपडे बदलायचे असतील न! मग मी तिला संध्याकाळी भेटू असे सांगून तिचा निरोप घेतला. रुमवर जात असतना पासून ते रुमवर जाऊन झोपे पर्यंत तिचाच विचार, तिचाच हसणारा चेहरा समोर येऊ लागला! पहिल्या नजरेतील प्रेम बहुतेक यालाच म्हणत असावेत. अप्पा सावंत ने केलेला मघाशीचा अपमान दैव-योगाने खरा व्हावा असं मनोमन वाटू लागलं.

नंतर एकाच शाळेत शिकवत असल्यामुळे, दररोज संपर्क येऊ लागला, पावसामुळे गळक्या छपराच्या खोलीत मोडक्या खुर्चीवर तासन तास बोलत बसू लागलो. पावसाळा संपूच नये असे वाटू लागले. या ३-४ महिन्यांत थोडीशी जवळीक आणि आपुलकी वाढल्याचे दोघानाही जाणवले, एकमेकांना चांगले मित्र समजू लागलो. त्या छोट्याश्या गावात आमचं दोघांचं एक नवीन विश्व तयार झालं. हे दिवस आणि हा पावसाळा संपूच नये असं वाटू लागलं. माझ्या एकाकी, दिशाहीन आयुष्याला एक नवीन उत्साह, एक नवी उम्मेद, नवी जिद्द, नवी दिशा मिळाल्यासारख वाटू लागलं. पण नियतीला माझे हे सुख, हा आनंद मंजूर नसावा! कारण या भौतिक आणि अकाली सुखाचा माझ्या उर्वरित आयुष्यावर खूप भयानक परिणाम होणार आहे हे नियतीने मला अगोदर सांगितले नव्हते!

भाग २

सप्टेबर च्या ऐन शनिवारी दुपारी पाउस उघडला. हवा मोकळी झाली, थोडा सूर्यप्रकाश हि बाहेर दिसू लागला. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला. तिच्या पण चेहऱ्यावर प्रसन्नता दिसू लागली. “इथे जवळपास फिरायला जाण्यासारखे ठिकाण आहे का?” ती. मी विचार करून बोललो, “हो, आहे न, गावाच्या बाहेर माळावर, एक खूप मोठे वडाचे झाड आहे, त्याच्या शेकडो पारंब्या जमिनीत घुसून एक खूप मोठा वृक्ष तयार झाला आहे, शिवाय शेजारूनचं एक नदी पण वाहते, अतिशय रमणीय ठिकाण आहे, मला जेव्हा एकटा एकटा वाटतं तेव्हा मी तिथेच जातो!” तिने लगेच जाण्याची तयारी दर्शवली. आमच्यातलं अंतर कमी होत होतं अन विचार जुळत होते!

आम्ही माळाच्या दिशेने चालू लागलो. टेकडी चढताना आणि चिखलातून वाट काढताना तिचा हात हातात घेणं मला अपरिहार्य होतं. चालत चालत त्या विशाल वटवृक्षाखाली येऊन पोहोचलो. शेजारी वाहणारी नदी अगदी तुडुंब भरून वाहत होती. तिच्या पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातवरण अगदी सुरेल करत होता. अमृता नदीच्या किनाऱ्यावर जाऊन उभी राहून प्रवाहाकडे पाहू लागली. इतका वेळ तिला बोलण्याच्या नादात नीटसं मी पाहू शकलो नव्हतो. तिने पांढऱ्या रंगाची वरती थोडी डिझाईन असलेली साडी घातलेली, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात निळ्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात एक सोन्याची नेकलेस, कानात छोट्या सोनेरी रिंगा, कपळावर अर्धी चंद्राची कोर, केस मोकळे सोडलेले, अन वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर उडणाऱ्या केसांच्या बटा तिचे सौंदर्य खुलवत होत्या. ती कुठल्या तरी विचारात गढून गेली, अन मी तिच्या सौंदर्यात!

“माझ्या मनात जे आहे, मला जे तिच्या बद्दल वाटते, तसेच तिलाही माझ्या बद्दल वाटत असेल का? एकदा विचारून बघुया का? आणि जर ती नाही म्हणाली, तर?” माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं. अगदी ओठापर्यंत आलेले प्रशन तसेच्या तसे गिळून टाकले. नंतर मीही तिच्या शेजारी जाऊन उभा राहिलो, बराच वेळ बोलत राहिलो, प्रेम, लग्न, समाज, शाळा, कॉलेज, गाव, घर किती तरी विषयावर बोलत राहिलो. ४ तास अगदी काही क्षणात संपल्या सारखे वाटले. ती पुन्हा शांत झाली. दिवस मावळतीकडे झुकला. ती मावळणाऱ्या सूर्यात पुन्हा हरवून गेली. तेवढ्यात आभाळ काळ्या ढगांनी भरून आले, आणि पाउस येण्याचे चिन्ह दिसू लागले. पण तिला त्या शांत, निश्चल, निरागस मुद्रेतून बाहेर काढण्याचे धाडस मला काही होईना.

आणि तेवढ्यात पावसाचे टपोरे थेंब हा हा म्हणता झप झप पडू लागले, ती लगेच भानावर आली. वारा सुटला. गाव जवळपास दीड किलोमीटर अंतरावर, वडाचे झाड सोडता दुसरा कुठलाच आसरा जवळ नाही! पावसाचे कसलेच चिन्ह नसल्याने छत्री आणण्याचा प्रश्नच नव्हता! आम्ही धावत झाडाखाली गेलो. दिवस मावळलेला, तिच्या मनात भीती पसरलेली! तिचे श्वास फुलले. तिने माझा हात घट्ट पकडला. त्या पकडीत तिचा माझ्यावर असलेला विश्वास मला जाणवला! पावसाचे पाणी झाडाच्या आतमध्ये हि पाझरू लागलं. दोघे एकमेकांना एकदम चिकटून उभे. तिने माझ्याकडे एकदा पहिले, माझ्या नजरेतले भाव तिला कळले असावेत, पण मला तिची नजर काही वाचता येयीना! तिच्या डोळ्यांत बघण्याचे धाडसच मुळी मला होईना! दोघेही त्या पावसात चिंब भिजलो. ती माझ्या अगदी जवळ आली, दोघांतील अंतर न मोजण्याइतके! माझा हात अगदी घट्ट आवळला गेला. तिचे सौंदर्य भिजल्यामुळे अधिकच खुलून दिसू लागले. पावसाचे काही (नशीबवान) थेंब तिच्या ओठांवरून पाझरू लागले. हे क्षण जाऊच नयेत, हा पाऊसदेखील आता थांबूच नये, हे कालचक्र कुणीतरी थांबवावे असे भलते-सलते विचार मनाला शिवू लागले. माझा तोल जाणार हे माझ्या लक्षात येताच मी भानावर येऊन एक पाउल मागे सरकलो! तिला ते समजायला काही क्षण लागले, अन लगेच तीही भानावर आली. हाताची पकड थोडी ढिली झाली, पण सुटली नाही! पाउस वाढला होता, आणि थांबण्याचे नाव काही घेत नव्हता!. काहीतरी बोलायचे म्हणून, मी म्हणालो, “पाऊस वाढला आहे, निघूया आता!” ती काही न बोलता माझ्या मागे चालू लागली. माझ्या मनात जे वादळ सुरु आहे तेचं वादळ तिच्याही मनात सुरु आहे यात तिळमात्र शंका नव्हती, पण बोलायचे धाडस कोणीच करेना!

चिखलातून वाट काढत आणि लोकांच्या नजरांचे भान ठेवून गावात पोहोचलो! तिला तिच्या रुमवर सोडून मी माझ्या रुमवर परतलो. रेडीओवर आपकी फर्माईश कार्यक्रमात माझ्या सारख्याच एखाद्या नव प्रेमिकाने “पेहला नशा, पेहला खुमा” या गाण्याची फर्माईश केली होती. रात्रभर तिच्याच विचारात तळमळत राहिलो. सोमवारी सकाळी शाळेला गेल्यावर जे काही मनात आहे ते स्पष्टपने तिला सांगण्याचे ठरवून मगचं झोपलो. अख्खा रविवार तिच्या सोबत घालवलेले एक-एक क्षण आठवण्यात कधी गेला कळलेच नाही!

अतिशय उत्साहाने, दाढी करून, कडक इस्त्रीचे कपडे घालून सोमवारी सकाळी लवकरच शाळेत दाखल झालो. मनात रात्री रेडीओवर ऐकलेले गाणे गुनगुनत होतो. शाळेत गेल्या गेल्या पोस्टमन ने एक पत्र माझ्या हातात आणून दिले. अवघ्या पाच महिन्यातच आमच्या दोघांच्याही बदली ऑर्डर्स आल्या होत्या. तिची बदली कोल्हापूर जिल्ह्यात आणि माझी बीड जिल्ह्यात! शाळेची दुरवस्था आणि कमी विद्यार्थी संख्या यामुळे ती शाळा रद्द करून शेजारच्या गावच्या शाळेला ती जोडली होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. अचानक काळजात कुठेतरी वेदना झाल्यासारख्या भासू लागल्या. माझ्यासोबत जणू सारा आसमंत रडत आहे कि काय असे वाटू लागले. पावसाच्या थेंबांचा छपरावर होणारा आवाज देखील ऐकू येयीनासा झाला! तेवढ्यात ती तेथे आली. तीही खूप खुश दिसत होती. मला आवडणारी गुलाबी रंगाची साडी तिच्या अंगावर होती. “मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय!” ती. मी तिच्या हातात ते कागद देऊन काहीच न बोलता स्तब्ध उभा राहिलो. माझे तिच्यासाठी लिहिलेले प्रेम पत्र असल्या सारखे वाटून अतिशय उत्साहाने तिने ते कागद पाहिले. आणि वाचता वाचता एका एका शब्दासोबत तिचा उत्साह गळून जाताना मी पाहिला! तिच्या डोळ्यांतून टपकन दोन थेंब पडले अन पन्हाळाच्या पाण्यात मिसळले! अतिशय केविलवाण्या नजरेने तिने माझ्याकडे पहिले, माझ्या डोळ्यातही थेंब दाटल्या सारखे मला जाणवले. १५ दिवसा नंतर आमची नवीन ठिकाणी जोईनिंग होती. बर बदल्या केल्या ते केल्या त्या देखील महराष्ट्राच्या दोन टोकाला!

मनातल्या मनात शासनाच्या नावाने इरसाल शिव्या हासडू लागलो! नंतर नशिबाला दोष देऊ लागलो! मग पावसाला दोष देऊ लागलो अन शेवटी, स्वत:लाच! काय गरज होती तिच्याशी इतकी जवळीक साधायची? कुणी सांगितले होते तिच्याकडे इतके आकर्षित व्हायला? शिक्षकाने या गोष्टी कराव्यात का? एका मनात अशा प्रश्नांचे काहूर! अरे पण शिक्षक हा सुद्धा एक माणूसच ना, त्याला भावना नसतात का? त्याने प्रेम करू नये का? आणि प्रेम करणे हा गुन्हा आहे का? दुसऱ्या मनात पहिल्या प्रश्नांची उत्तरात्मक प्रश्न!

अशा स्थितीत तिला माझ्या मनातले सांगावे कि नको या विचारात दिवस भरभर निघून जात होते. ती देखील ऑर्डर मिळाल्यापासून मला टाळत होती. शाळेला अगदी वेळेवर यायची अन शाळा सुटल्या सुटल्या जायची. तिच्या मनात काय आहे ते काही मला कळेना.

अन शेवटचा दिवस अजडला. मी सकाळी लवकर शाळेत गेलो. पण ती आलीच नाही. दुपार पर्यंत वाट पाहिली पण ती आली नही. शेवटी तडक उठलो आणि तिच्या रुमवर गेलो. तिचे वडील तिला नेण्यासाठी आले होते. तिने सगळे समान आवरून ४ वाजताच्या बस ने जाण्यासाठी तयार होऊन बसली होती (कि माझ्या येण्याची वाट बघत होती, कोण जाणे). मला पाहताच तिला क्षणभर आनंद झाला आणि लगेच तो आनंद मावळला! बराच वेळ दोघेही एकमेकांना बोललो नाही. तिचे वडील बराच वेळ माझ्याशी बोलत होते अन मला ते काहीच ऐकू येत नव्हते.

थोड्या वेळाने वडील पण कंटाळून बाहेर जावून बिडी शिलगावून बसले.

“शरद, मला माफ कर!” एवढे ४ शब्द बोलून ती रडू लागली. मी काहीच बोललो नाही. थोड्या वेळाने हुंदका आवरून बोलली, “इथपर्यंतच आपली सोबत होती. कदाचित नियतीला देखील मंजूर नसावे. असो, शक्य तेवढ्या लवकर मला विसरून जा!” मी काही बोलणार तेवढ्यात तिचे तीर्थरूप बिडी विझवून आत मध्ये आले आणि ब्यागा उचलू लागले. माझ्या हृदयाची स्पंदने वाढली. काहीतरी आपलं हरवत आहे, दूर जात आहे असं वाटू लागलं. मनाची चलबिचल होऊ लागली. मनात दाटलेले हुंदके ती गिळून टाकत होती. आम्ही बस जिथे थांम्बते तिकडे निघालो. अन तितक्यात पाउस सुरु झाला. रत्नागिरीचा पाउस. तिच्या वडिलांनी छत्री उघडली. मी तसाच भिजत भिजत चालू लागलो.

अशा दुखात पाउसचं आपलं दुख समझू शकतो. पावसाच्या त्या थेंबात माझ्या डोळ्यांतील थेंबांनीहि थोडी भर घातली. जणू माझ्या मनाचे सांत्वन करण्यासाठीच हा पाउस आला आहे असे वाटू लागले. जाताना माझे हे अश्रू तिला दिसू नयेत म्हणून तो स्वत:च रडत असावा!

तिला सोडण्यासाठी गावातील चार-दोन प्रतिष्ठित मंडळी आणि काही विद्यार्थी छत्र्या पांघरून बाजूला उभे होते. बस आली! तिचा पाय उचलेना. वडिलांनी सामान आत ठेवले. ती हळूच माझ्याकडे आली, माझे हात हातात घेऊन शेवटचे माझ्या नजरेत पाहून बोलली, “बऱ्याच गोष्टी मनात असतात, त्या समोरच्याला सांगायच्या असतात, पण मनातून बाहेर येताना त्या ओठांतच अडखळून राहतात, आणि जेव्हा धाडस करून त्या गोष्टी आपण सांगायला जातो, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मला नही सांगता आलं माझ्या मनात काय होतं ते, पण निदान तू तरी संगयाचास न!” माझ्या काळजात कुठेतरी वेदना झाली. “काळजी घे स्वत:ची” असे बोलून ती बस कडे निघाली, हातातून हात सुटला, बस मध्ये चढता चढता तिने एक शेवटचा कटाक्ष माझ्याकडे टाकला. एवढी एकच नजर मला उर्वरित आयुष्य जगण्यासाठी पुरेशी होती. शेजारच्या चहाच्या टपरीवर लागलेले “मेरी किस्मत में तू नही शायद” या गाण्याचे पुसटशे बोल कानावर येत होते. बस निघाली. तिने खिडकीतून हात हलवून निरोप घेतला. मी किती तरी वेळ त्या जाणाऱ्या बसकडे पाहत उभा होतो. स्तब्ध, नि:शब्द! आणि पाउस तेवढा मात्र सोबतीला होता. बेभान होऊन कोसळत होता. रत्नागिरीचा पाउस!

तेवढ्यात बेल वाजली. माझा चहा थंड होऊन गेला होता.

भाग ३

(क्रमश:)

पुन्हा शून्यात पाहतो मी

माझ्या स्वत:च्याच विश्वात
असा हरवून जातो मी
सारे काही कमवून-गमवून
पुन्हा शून्यात पाहतो मी!

नशिबाला दोष देत
नियतीचे गाऱ्हाणे गातो मी
तळहातावरील रेषा खोडत
नशिबावर हसतो मी

रखरखत्या उन्हात
अनवाणी फिरतो मी
अन अवकाळी पावसात
अश्रूंना वाट देतो मी

भ्याडांच्या गर्दीत
स्वत:ला हरवतो मी
ओळखीच्या चेहऱ्यांमध्ये
अनोळखी होऊन जगतो मी

विरणाऱ्या मृगजळाच्या
पाठी पाठी धावतो मी
अन सारे काही कमवून-गमवून
पुन्हा....शून्यात पाहतो मी!

महेश.
२२/८/११

प्रेम

प्रेम..प्रेम म्हणजे एक भास..
ती जवळ नसताना...
प्रेम म्हणजे एक श्वास..
दोघं सोबत असताना..
महेश.

प्रेम
प्रेम म्हणजे एक बहाणा...
एकमेकांसाठी जगण्याचा
प्रेम म्हणजे एक बहाणा..
एकमेकांसाठी मरण्याचा...
महेश.

प्रेम
प्रेम असतो एक गारवा...
रखरखत्या उन्हात थंडावनारा
प्रेम असतो एक आधार..
ती जवळ असल्यावर वाटणारा..
महेश.

प्रेम
प्रेम असते एक कोडे...
दुनियेला न उलगडलेले
प्रेम असते एक नाते..
प्रेमिकांच्या काळजाला भिडलेले!

महेश.

बेवफाई


यूँ तो देखे है कितने मौसम हमने जिंदगी में...
वो साथ थे तो समां ही कुछ और था...
देखि है जन्नते हमने जिंदगी में...
जब उनके साथ थे वो जहाँ ही कुछ और था!

दुनिया भर के मैखानो से पि के आया हूँ...
उनकी आँखों में मगर, नशाही कुछ और था!
बरसो बीत गए यारों कुछ पलों की तरह
उनके साथ बिताये पलों में मगर, मजा ही कुछ और था!

की है हमने वफाये अपनी जाँ पर खेलकर...
उनकी बेवफाई का यारों, अंदाज ही कुछ और था..
यूँ तो उनके एक इशारे पे हम जान देते
तडपा तडपा के मारने का, अंदाज ही कुछ और था!

महेश.
प्रेम एक--अविष्कार अनेक!

तू नसताना

संथ वाहणाऱ्या नदीस जसा अचानक पूर यावा...
अन वादळात जसा पालापाचोळा उडावा...

अशी काही अवस्था तू नसताना माझी झाली..
सारं काही असून सुद्धा माझी ओंजळ रिकामी..
तू नसताना सुद्धा होतात तुझ्या स्पर्शाचे भास...
तुझ्या आठवणीत हल्ली, अडखळतात माझे श्वास...

गेलीस अबोला धरून, अन शब्द माझे संपले...
निश्चल झालो असा काही, हृदय माझे थांबले...

प्रिये, भावनांच्या ये खेळात पुरता मी हरलो...
अनोळखी चेहर्यांच्या गर्दीत, शेवटी, एकटाच मी उरलो..!
महेश.