Mann Maze

Mann Maze

न लिहिलेलं पत्र

वाढदिवसाच्या तुला मनापासून खूप सार्या शुभेच्छा! तुझ्या आनंदी आणि हेल्दी आयुष्यासाठी मी नेहमीच देवाकडे प्रार्थना केली आहे आणि करत राहीन.

तुझ्या वाढदिवसाच औचित्य साधून तुझ्यासाठी काहीतरी लिहिण्याचा मूड झाला माझा आणि मी लिहायला बसलो. पण नेमक काय लिहावं आणि नेमकं कुठं सुरु करून कुठे थांबावं हा मोठा प्रश्न पडलाय मला. तरीही प्रयत्न करून बघतो.

हे कधी, कसं, कुठे, कुणामुळे सुरु झालं काही कळलच नाही. अचानक भर उन्हाळ्यात येणाऱ्या अवकाळी पावसा सारखी तू माझ्या आयुषात आलीस आणि माझ्या ओसाड जीवनात थोडासा गारवा देऊन गेलीस. सदैव बंद असणाऱ्या माझ्या मनाचे दार तू अगदी मला न विचारताच उघडून अलगद आत जावून बसलीस. कुठे शिकलीस ही कला?
माझ्या मनात काय सुरु आहे हे देखील तुला माझ्या ओठांवर येण्या अगोदरच समजू लागले! मनकवडी झालीस तू!

तुझ्या डोळ्यांत बघणं मी मुद्दाम टाळत होतो! अगदी पहिल्यापासूनच! कारण तुझ्या त्या करारी नजरेत मला बुडवून घेण्याच सामर्थ्य होतं. आणि खरं तर मला भीती होती कि मी जर त्या डोहात बुडलो तर मला त्यातून कुणीही बाहेर नाही काढू शकणार! अगदी मला देखील ते अशक्यच होतं.

मेंदू आणि हृदय हे एकमेकांचे शत्रू असावेत. मेंदू जे करू नको म्हणेल तेच हृद्य करून बसते. आपलं बोलनं वाढलं, आपल्या भेटी वाढल्या. तुझ्या एका भेटीसाठी हजारो मैलांचा प्रवास अगदी क्षुल्लक वाटू लागला. तुझ्या सोबत काही तास घालवण्यासाठी जीव धडपडू लागला. सागराला नेमकं उधान यायला आणि मृग नक्षत्र सुरु व्हायला गाठ पडावी तसं काहीसं आपलं झालं. आपली वर्षभराची मैत्री आता एका वेगळ्या वळणावर येऊन थांबली. ते वळण पार करून गेलो तर दोन शक्यता जाणवू लागल्या. कदाचित प्रेमाचा नवीन प्रवास सुरु तरी सुरु होईल किंवा मग सुखद मैत्रीचा अंत तरी होईल. एकमेकांना मनसोक्त बोलल्याशिवाय दिवस जाईनासा झाला. अगदी सकाळी उठल्यावर गुड मोर्निंग पासून, ब्रेकफास्ट, लंच, दिनर ते गुड नाईट पर्यंतचे अपडेट्स एकमेकांना देऊ लागलो. फोनवर बोलण्यासाठी रात्र कमी पडू लागली. दोघांचे सारे सिक्रेट्स जे कि जगातील कोणत्याही व्यक्तीला माहिती नाहीयेत ते आपण एकमेकांना शेअर केले. ते देखील स्वत:हून! थोडासा दुरावा देखील मनाला अस्वस्थ करू लागला. जेव्हा तुझ्या मनाचा अंदाज घेतला तेव्हा तू देखील त्याच वळणावर येऊन त्याच दोन शक्यता मनात घेऊन थांबली आहेस असं जाणवलं.

दोघानाही कळून चुकलं होतं कि आता आपण मैत्रीची रेषा ओलांडतो आहोत. आणि तू शेवटी विचारलस, “आपण प्रेमात तर नाही ना पडलो?” तुझ्याकडूनच हा प्रश्न आल्याने माझं मन थोडं हलकं झालं! तुझ्या प्रश्नाला नकारार्थी उत्तर देण्याचं काही कारण नव्हतंच, पण “हो” म्हणण्याची डेअरिंग देखील माझ्यात नव्हती.
अजूनही आठवतो आपला तो फोन वरचा पूर्ण संवाद!
“सांग ना, आपण छान फ्रेंड्स आहोत, आपल्याला इतरही छान फ्रेंड्स आहेत, त्यांच्याविषयी असं कधीच नाही वाटलं, पण तुझ्याशिवाय एक क्षण देखील करमत नाही. आपण एकमेकांच्या प्रेमात तर नाही न पडलो?”
 “तुला काय वाटतं?” तुझ्या मनाचा अंदाज घेत मी.
थोडासा पौझ घेऊन, “मला वाटतं आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय!” तू.
हे देखील तुझ्याकडूनच ऐकायला मिळाल्याने माझं मन अगदी ढगात जावून बसलं!
“बहुतेक. कारण आपला दिवस सुरु होतो एकमेकांपासून आणि संपतो देखील एकमेकांसोबतच. तुझ्या प्रत्येक गोष्टीचे माझ्याकडे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचे तुझ्याकडे अपडेट्स असतात. असा एकही दिवस मागच्या वर्षात नाही गेला कि आपण त्या दिवशी बोललो नाही. दोघांच्या आवडी-निवडी जरी सारख्या नसल्या तरी त्या एकमेकांना माहिती आहेत. दोघांचे चांगले-वाईट गुणही एकमेकांना माहिती आहेत. दोघंही मनसोक्त भांडतो आणि मग तितक्याच प्रेमाने एकमेकांना समजावून सांगतो. दोघानाही आता स्वत:पेक्षा एकमेकांची जास्त काळजी वाटते, प्रेम यापेक्षा जास्त काही वेगळे नसावे! होय, आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय, आणि आज नाही, तर खूप पूर्वी. फक्त आता त्याची जाणीव झालीय आपल्याला!” मी.

तर अशा प्रकारे, आपण प्रेमात पडलोय ते एकदाचं कन्फर्म झालं! इतर कपल्स सारख आपल्यात काही घडलंच नाही. ना फॉर्मल प्रपोज, ना लव लेटर ना कुठला प्रसंग! पण प्रेमात मात्र पडलो खरं!
आता ओढ लागली ती त्या हजारो मैलांच्या प्रवासाची आणि तुझ्या भेटीची. माझ्या पहिल्या-वहिल्या प्रेयसीच्या भेटीची!

गारठा हिवाळा. रात्रीची बस पकडून १४ तासांच्या प्रवासानंतर अगदी सकाळी तुझ्या शहरात मी दाखल, तू अजून पहाटेची गोड स्वप्न बघत झोपलेली, मी माझ्या मित्राकड जावून त्याला भेटून नंतर हॉटेलवर राहण्याचं माझं  ठरलेलं, पण तुझ्या शहरात येऊन पहिल्यांदा तुला न भेटन, माझ्या मनाला पटलं नाही!
सकाळी ७ वाजता दाट धुक्यात, तुझा तोंडी सांगितलेला पत्ता आठवून, रिक्षा तिकडे वळवली. तुला फोन लावला आणि तुला बोलावून घेतलं, तू डोळे चोळत खाली आलीस. पहिल्यांदा माझ्या प्रेयसीला भेटतोय, ते पण अंघोळ न करता, आणि तू पण! प्रचंड थंडी, त्यात तू स्वत:ला आकडून माझ्यासमोर हसत उभी, केस थोडेसे विस्कटलेले, पण तुझं ते अगदीच नजर खिळवून ठेवणारं नैसर्गिक सौंदर्य, मला माझ्या मनावरचा ताबा तोडण्यास मजबूर करत असल्यासारखं जाणवलं. का कुणास ठावूक, पण इतक्या सकाळी तुझ्या ओठांवर किस देण्याचा मोह मला झाला. पण मन मारून कंट्रोल केलं स्वत:ला!
आता एवढ्या सकाळी काय बोलणार तुझ्याशी? मग शेजारच्या टपरीवर वाफाळलेला चहा तुझ्याकड पाहत ३ वेळेस पोटात रिचवला. दोघांची पण प्रेमात पडण्याची पहिलीच वेळ असल्यानं आता नेमकं काय करतात या कुचम्बनेत  आपण दोघेही सापडलो. उगाच अरसिक विषयावर तुटक तुटक बोलू लागलो.
“चल आपण थोडसं फिरून येऊया?” तू.
साला हे मला का सुचलं नाही विचारायचं?

ब्याग त्या चहाच्या टपरीवर ठेवून, निर्मनुष्य रस्त्यावर दाट धुक्यात आपण दोघे चालू लागलो. का कुणास ठावूक, पण मैत्रीची रेषा ओलांडल्या नंतर आणि नवीन नात्यात पदार्पण करताना कुठेतरी थोडी संकोचाची दरी निर्माण झाल्यासारखं वाटलं! तुझ्या खांद्यावर टाकण्यासाठी उचललेला हात ३ वेळेस तसाच खाली घेतला. खूप चाललो ना आपण त्यादिवशी? चालता-बोलता अर्धा तास धुक्यात फिरल्यावर नवीन नात्यातील ती दरी अचानक कुठेतरी गायब झाल्यासारखं आणि मैत्रीतील ती खोडकर प्रवृत्ती अजूनही पूर्णपणे जिवंत असल्याची प्रचीती आली.

नंतर आपल्या कित्येक भेटी झाल्या, किती फिरलो, खूप सार्या आठवणी जमा केल्या, प्रेमात अक्षरश: बुडून गेलो, भांडण, रुसवा, फुगवा, सारं काही करून आजही आपली मैत्री आणि प्रेम उत्तरोत्तर वाढतच आहे. अजूनही मी तितक्याच ओढीने तो हजारो मैलांचा प्रवास करतोय, आणि तुही तितक्याच ओढीनं सकाळी डोळे चोळत मला भेटायला येतेस! प्रत्येक सकाळी मला तू पूर्वीपेक्षा सुंदर भासतेस, आणि तुझ्या त्या स्माईल वर तुझा एक किस घेण्याची अजूनही माझी तितकीच प्रबळ इच्छा होते.

कसल्याही टेन्शन मधून अगदी दहा मिनिटात तुझ्याशी बोलून मी बाहेर निघतो, माझा ऑफिस मधला स्ट्रेस तुझं निखळ हास्य ऐकून कमी होतो, तुझ्या मिठीत मी सारं जग विसरून जातो! तुझ्या मिठीतच आयुष्य संपून जावं असंही मला कित्येकदा वाटत! खरच जर तसं काही झालं तर माझ्यासारखा सुखी दुसरा कोणी नसेल! (मला माहितीय हे वाचून तू मला मनात दहा-बारा शिव्या दिल्या असशील आता, असो.)

हे सगळं असंच चालत राहावं असं मनोमन वाटत राहतं नेहमी. आपलं पुढे लग्न होईल, नाही, काही माहिती नाही, पण जो वर्तमान आपण जगतोय तो खरच खूप छान आहे. भविष्यातही हा वर्तमान असाच राहावा!

शेवटी, काळत-नकळत माझ्याकडून बर्याच वेळा तुला हर्ट झालं असेल, पण त्यामागे केवळ तुझ्यावर असलेलं प्रेम आणि तुझी वाटणारी काळजी हेच कारण होते, आहे आणि असेल. माझ्यावर असच निरंतर प्रेम करत राहा. अगदी माझ्या पेक्षाही जास्त!

या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण का कुणास ठावूक, तुला त्या सांगण्याची इच्छा झाली, आणि म्हणून हा सगळा लिहिण्याचा प्रपंच-पसारा!

भेटू आता गुरुवारी सकाळी. त्याच ठिकाणी, नेहमीसारख!

स्वप्न..

बाहेर धो धो कोसळणारा पाउस,
अशा मुसळधार पावसात
तुझ्या सोबत केव्हातरी
चिंब भिजण्याची स्वप्न
ऑफिस मध्ये बसून रंगवणारा मी,
आणि याची पुसटशीदेखील कल्पना नसलेली तू!

एवढं छोट आणि साधं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तुला भेटायला तुझ्या गावी येतो, आणि नेमकं तेवढे दोन दिवस मला आवडणारा, माझा वाटणारा तो पाउस तुझ्या गावातून काढता पाय घेतो! मी कोरडाच राहतो!

बघता बघता हाही पावसाळा सरून जाइल!
सोबत भिजण्याचं ते स्वप्न देखील पुढच्या पावसाळ्या पर्यंत मागे पडून जाइल!

मन वेडं, लगेच येणाऱ्या हिवाळ्यातील दाट धुक्यात तुझा हात हातात धरून फिरण्याची स्वप्नं रंगवू लागेल!
मागच्या हिवाळ्यातल्या सारखं!

तुला पडतात का अशी छोटी छोटी वेड्यासारखी स्वप्न?

आदत

तुम्हारी आदत हुई है या दुनिया से नफरत पता नहीं।

तुम्हे छोड़ दू या दुनिया, बात तो एक ही है!

एक मौका

रोज तुम्हारी राह देखकर थक गये है हम,
सोचते है अब राह देखने का एक मौका तुम्हे भी दे दें..जिंदगीभर के लिए।

मै नही तो कोई और सही

तिला आवडतं पावसात भिजायला!
बेधुंद पावसात मनसोक्त नाचायला!

नेहमी म्हणायची,
"येणाऱ्या पावसाळ्यात आपण दोघं मिळून मस्त भिजूया…
एकमेकांना मिठीत घेऊन पावसाचे थेंब तळहातावर झेलुया! "

मन वेडं…लगेच लागलं स्वप्न रंगवायला!

तो कुणीही असो… तुझं स्वप्न पूर्ण झालं ना… बस्स!
मै नही तो कोई और सही! चलता है यार!

गारा

अनेकदा पाहिलंय तुला...धुंद कातरवेळी...पावसात भिजताना...
त्या ढगांखाली उभी असतेस...एखाद्या विद्युल्लतेसारखी...
शुभ्र...नितळ...धवल...
अन वळीव बरसत असतो तुझ्यावर...
एखाद्या शुभ्र प्राजक्तासारखा...
म्हणूनच लोकांना...
तुझ्या काव्यातून...गारा बरसल्याचा भास होतो...
आणि तुझ्या ओंजळीत विरघळनाऱ्या गारांत काव्य दिसतं!

Mantralay on Fire

लागली आग, उठला धूर...
बघ्यांच्या मनी, माजले काहूर...

जळाला ऐवज, जळाल्या फाईली...

जवानांच्या जीवाची काहिली काहिली...

मजल्यावर मजला, खाक झाला आगीत...

महाराज बोलले, हे माझेच भाकीत!

बुडाखाली आग, राजा असा कसा झोपला?

सुरक्षेचा दोर याच्या हाती आम्ही दिला !

जनता जनार्धन, कधी उघडील डोळे...

किती दिस लुटणार, आम्हा मंत्री हे "भोळे"...

पुंण्याची गंगा यांच्या, झाली रातोरात कोरडी...

मंत्र्या संत्र्याची परी, कधी उठेना तिरडी!

महेश....

"कुसळधार" आणि "मुसळधार"

गावाकडची बातमी: "सलग १८ तास "कुसळधार" पाउस पडला....आणि रस्त्याच्या कडेचे खड्डे तेवढे भरले."
आता सरकारने १८ तास पाउस पडला या निकषावरून जाहीर केलेला दुष्काळ "क्यान्सल" करू नये म्हणजे झालं!!
"कुसळधार" आणि "मुसळधार" मधला फरक सरकारला समजेल अशी आशा आहे.

....!

उधाणलेला समुद्र
आणि खवळलेली लाट...
पौर्णिमेचा चंद्र 
आणि सरत जाणारी पहाट!

आता तो समुद्रही शांत,

अन ती लाटही विरलेली!
अमावस्येचा काळोख 
अन ती रात्रही मंतरलेली!

महेश.

शेती व्यवसाय

माझ्या वडिलांनी सन १९७७ साली MSc Agri (MPKV Rahuri) पदवी मिळवली, आणि कित्येक संधी अक्ख्या महाराष्ट्रात उपलब्ध असताना देखील स्वत:ची शेती करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. अगदी घरच्या लोकांपासून ते गावातल्या प्रत्येकाने त्यांना वेड्यात काढले, कारण त्या काळात आमच्या पंचक्रोशीत एवढे शिकलेला एकमेव माणूस एवढे शिकून पुन्हा शेतीत कशाला परत येतोय हे कुणाला कळाले नाही. वडील त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. वेगवेगळे प्रयोग करून, नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्यांनी शेती फुलवली. दरवर्षी विविध पिके घेतली. भरघोस उत्पन्न काढून दाखविले. शिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी शरद जोशींसोबत अख्या महारष्ट्रात शेतकरी संघटनेचे बरीच वर्षे नेतृत्व देखील केले.
पण शेवटी शेवटी सरकारी धोरणे, निसर्गाने सोडलेली साथ, वाढलेले रोजगार भाव यांच्यामुळे एवढी चांगली शेती तोट्यात येऊ लागली.
दरम्यान मी स्व-इच्छेने मराठवाडा कृषी-विद्यापीठात कृषी-अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि वडिलांना "माझा तांत्रिक शेती करण्याचा मानस" कळविला. कारण MMBS करून मुले स्वत:चा दवाखाना सुरु करतात, BE करून छोटी-मोठी फ्याक्टरी टाकतात, MBA करून वडिलांच्या व्यवसायात हातभार लावतात, मग Agriculture course करून मुले शेती का करत नाहीत? हा प्रश्न मला सतावत राहायचा.
वडिलांनी सर्व परिस्थितीचा विचार करून स्पष्ट शब्दात "नाही" म्हणून सांगितले. कसली का असेना पण मी नौकरीच करावी असे त्यांचे मत होते. आणि त्यात त्यांच्या दृष्टीने चूक काहीच नव्हते. कारण शेतीची ढासळत चाललेली अवस्था त्यांना, मला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला माहिती होती. आणि त्यात एवढे शिकून मी पुन्हा शेतीत येणे म्हणजे स्वत:च्या हाताने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतण्यासारखे होते. शिवाय त्यांनी हे सर्व स्वत: अनुभले असल्यामुळेच तर ते एवढ्या ठामपणे नको म्हणून सांगत असावेत.
सारासार विचार करून मग मी काही दिवस एका मायक्रो इरिगेशन कंपनीसाठी काम केले, नंतर उच्च शिक्षणासाठी बंगलोरला आलो. आणि M.Tech. करून पुन्हा नौकरीच करतोय. पण शेती करू शकलो नाही याची खंत अजूनही माझ्या आत कुठेतरी सलत राहतेय.

आणि आज जेव्हा मी गावी जातो, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याचा हाच विचार झालेला दिसतोय, कि त्याच्या मुलाने शेती करू नये. आदळत आपटत शिकून, शिपायाची का मिळेना, पण नौकरीच करावी. पुढील २५ वर्षानंतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भयानक कमी होईल यात शंका नाही.


खरच शेती व्यवसाय करणे एवढे लाजिरवाणे आणि कनिष्ठ दर्जाचे झाले आहे का?

फक्त ऊसच का?


भारत हा कृषिप्रधान देश आहे हे आपण इतिहास आणि भूगोलात अगदी चौथी-पाचवी पासून वाचत आलो आहोत. भारतीय शेतकरी जगातील सर्वात जास्त पिके घेतो, शिवाय भारतीय जमीन हे पेराल तेथे सोने उगवणारी जमीन आहे असे देखील म्हणतात. पण हे सर्व पुस्तकात वाचण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. खरी परिस्थिती खूप वेगळी आहे.

भारतात हजारो वर्षापासून घेतल्या जाणार्या पिकांमध्ये ऊस हे एक महत्वाचे पीक आहे. असे असले तरी ऊस हे भारतीय शेतीकर्याचे प्रमुख पीक कधीच नव्हते. मग असे काय घडले कि आज ऊस हे पीक भारतीय शेतीचा अविभाज्य घटक बनले?
आपण या ठिकाणी माझ्या एका गावाचा विचार करूया, त्यावरून मग आपणास पूर्ण भारतातील किंवा कमीत कमी महाराष्ट्रातील परिस्थितीचा अंदाज येयील.
१९७१-७२ साली माझ्या ४ हजार लोकसंख्येच्या गावात फक्त ४ शेतकर्याकडे विहिरी होत्या, त्यातील तिघांकडे सिंचनासाठी मोट वापरली जायची आणि एका शेतकर्याकडे (आमच्याकडे) क्रूड ओईल वर चालणारे इंजिन होते. तर हे चार शेतकरी फक्त पाण्याची शेती करत आणि यांच्याकडे एकूण १५-२० एकर ऊस होता. इतर क्षेत्र निव्वळ ज्वारी, हरभरा, तूर, गहू अशा रब्बी पिकाखाली असायचे. खरीप हंगामात सहसा पिक घेत नसत.
त्याकाळात ऊस हा फक्त गुळ बनवण्यासाठी वापरला जायचा, साखर नावाचा प्रकार अद्याप या भागात अस्तित्वात आलेला नव्हता. दरम्यान या भागात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना झाली, तत्कालीन सुशिक्षित पुढार्यांनी शेतकर्यांना सहकाराचे महत्व पटवून दिले, शेअर्स जमा केले, शेतकर्यांना ऊस लावण्यास प्रोत्साहित केले, शिवाय इतर पिकांपेक्षा उसाला चांगला भाव देऊ केला, आपसूक गावातील विहिरी वाढल्या, मोट वाढल्या, इंजिन वाढले. १९८५ साली गावात पहिले बोर पाडले गेले. १९९० पर्यंत गावात २०० बोर पाडले गेले. ऊस क्षेत्र ५०० एकर पर्यंत गेले. ऊस या नगदी पिकामुळे शेतकर्यांना बर्यापैकी उत्पन्न मिळू लागले, आणि आपसूक परिसरातील सर्व शेतकरी ऊस लागवडीसाठी धजू लागले.
२००० सालापर्यंत परिसरात १० साखर कारखाने उभे राहिले, कारखान्यात स्पर्धा लागली, शेतकर्यात स्पर्धा लागली. एकट्या गावाचे उस क्षेत्र ५००० एकरच्या वर गेले. गावात २००० पेक्षा जास्त बोर पाडले गेले. पाणी पातळी १०० फुटावरून ६००-७०० फुटावर गेली. ऊसामुळे इतर खरीप रब्बी पिके मागे पडली. रोजगाराचे भाव वाढले. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रमाणाबाहेर पाणी आणि रासायनिक खते वापरण्यात येऊ लागली. सलग १०-१० वर्षे एकाच जमिनीत उस घेण्यात येऊ लागला. जमिनीचा कस खालावला. सुरुवातीस एकरी ६०-७० टन निघणारा उस २००५ पर्यंत ३५-४० टन निघू लागला. शिवाय सहकारात राजकारण सक्रीय झाले, भ्रष्टाचार सुरु झाला, संचालक आणि कार्यकारी मंडळीनी आपले खिसे भरून घेतले. उसाचे भाव स्थिर झाले, कारखाने डबघाईला येऊ लागले.१९९०-२००५ या काळात खासगी कारखान्यांचा जन्म झाला. पुन्हा भाव देण्यासाठी स्पर्धा, शेतकऱ्यांची स्पर्धा. यामुळे महाराष्ट्रातील फळबाग क्षेत्र झपाट्याने कमी झाले. द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्री, चिकू घेणारे बहुतांश शेतकरी उसाकडे वळले. कांदा, मिरची आणि इतर भाजीपाला घेणारे शेतकरी देखील उसाकडे वळले. मराठवाड्यातून ज्वारी, हरभरा आणि गहू हि पिके संपुष्टात आल्यात जमा झाली.
२०११ सालापर्यंत परिसरात १६ साखर कारखाने उभे आहेत. गावात ५००० च्या आसपास बोर पाडले आहेत. पाणी पातळी ९०० ते १००० फुटावर गेली आहे. दर वर्षी किमान ३००-४०० बोर नवीन पडत आहेत. पैकी ५०-६० बोर ला पाणी लागते आणि इतर सारे फेल जात आहेत. भू-गर्भाची अक्षरश: चाळणी झाली आहे. अगदी २०-२५ फुटावर ३-४ बोर झाले आहेत. पर्जन्य कमी झाले आहे, उस उतारा आता केवळ २०-२५ टन प्रती एकर झाली आहे. खताच्या किमती गगनास भिडल्या आहेत. रोजगार देखील खूप वाढला आहे. उस पिक तोट्यात येऊ लागले आहे.
२०१२ म्हणजेच चालू वर्षी पर्जन्य खूपच कमी झालं आहे, आणि उस या पिकावर अवलंबून न राहता मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन या खरीप पिकाकडे, आणि हरभरा व कांदा या रब्बी पिकाकडे वळला आहे. किंबहुना सोयाबीन हे पिक यावर्षी उसापेक्षा फायदेशीर ठरले आहे. आणि २०१३ या साली उस क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत केवळ २० टक्के इतकेच राहील कि काय अशी शंका निर्माण झाली आहे. डाळिंब, चिकू आणि मोसंबी फळबाग क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. आणि या परिस्थितीचा अंदाज आल्याने पुन्हा खासगी साखर कारखान्यात भाव देण्यावरून कमालीची स्पर्धा लागली आहे.
हे चित्र आहे फक्त माझ्या एका गावाचे. आणि हीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. ऊस या नगदी पिकामागे धावताना महाराष्ट्रातील “काळी कसदार मृदा”(Black Cotton Soil) हि गोष्ट आता नामशेष झाली आहे. अमाप रासायनिक खते आणि औषधांच्या वापरामुळे जमिनीचा पोत, कस, दर्जा, आणेवारी अगदी निकृष्ट झाली आहे. पाण्याची सरासरी पातळी ६००-७०० फुट इतकी खालावली आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी हि मूळ मराठी पिके काळाच्या पडद्याआड जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आणि शेवटी एवढ सगळं होऊनही शेतकरी मात्र जिथल्या-तिथंच आहे, आणि यामुळे मनात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आज तो रस्त्यावर उतरला आहे, आणि सरकारी बंदुकीचा शिकार झाला आहे. अजून दहा वर्षांनी महाराष्ट्रातील शेतीचे काय आणि कसे चित्र असेल देवच जाणो!
झालेल्या प्रकारात सरकारी धोरणांची आणि सहकारी-खासगी कारखान्यांची जेवढी चूक आहे तेवढीच चूक शेतकर्याची देखील आहे!
Mahesh Haul Patil, बंगळुरु.

डोंगरमाथा

क्षितिजापलीकडे, नजर जाइल तिथपर्यंत किंवा त्याच्याही पलीकडे पसरलेल्या डोंगररांगा...त्यातल्याच डोळे बंद करून बोट ठेवून निवडलेल्या एका ओबड-दोबड डोंगराच्या माथ्यावर...सूर्यास्ताच्या वेळी...सौम्य आणि थंड वार्याच्या झुळुकी अंगावर झेलत...त्या मावळणाऱ्या, लालबुंद, एकाकी सूर्याकडे पाहत उभे असताना, मनात एकामागून एक, भूतकाळातील काही क्षणचित्रे येणं आणि मन कधी अस्वस्थ होणं तर कधी नकळत ओठांवर स्मित हास्य खुलून जाणं साहजिक आहे...त्याला आवडतं असं कधी कधी डोंगर माथ्यावर जावून किंवा समुद्र-किनार्यावर जावून एकांत अनुभवनं! या रहाटगाडगी व्यस्त जीवनात, आपल्या आयुष्यात कधीकाळी येउन गेलेल्या काही व्यक्ती पण काळाच्या ओघात पडद्याआड हरवून गेलेल्या...त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण पुन्हा आठवायला!
त्या आठवणीच्या गाठोड्यातील काही क्षण पुन्हा एकदा तेवढीच कळ काळजात उठवून जातात, काही मात्र पुन्हा ओठांवर हसू परत आणतात!
यावेळी मात्र तो एकटा नव्हता...त्याच्या "ती" होती, त्याची सर्वात आवडती व्यक्ती...तिच्यासोबत असताना एकांत वगैरे शब्द त्याला टोचतात, नकोसे वाटतात, पण ती सोबत नसताना मात्र एकांत काय असतो याची त्याला तीव्रतेने जाणीव होते, जीवाची एक वेगळीच घालमेल होते! दुर्दैव ते किती, दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात, एकमेकांसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी, पण केवळ सामाजिक बंधनांमुळे आयुष्यभरासाठी ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत! पण त्यांच्या मनाची तयारी आहे, जे क्षण आपले आहेत ते तरी आपण सोन्याचे करूया, जगून घेऊया त्या मुठभर क्षणांत...जमेल तसे!
यावेळी या डोंगर माथ्यावर मात्र त्याला जाणवले, "आयुष्यात असे क्षण क्वचितच येतात, क्षणभराच्या भेटीतच आयुष्यभराचे होतात!"
कारण यावेळी तो एकटा नव्हता... आज त्याच्यासोबत "ती" होती! आणि आज पहिल्यांदाच त्याला जाणवले कि मावळणारा सूर्यही एकटा नसतो, त्याच्या सोबत एक रम्य सायंकाळ देखील त्याची सोबत करत असते!

(माझ्या "डोंगरमाथा" या अर्धवट राहिलेल्या गोष्टीतून...)

येशील का

एक पत्र:
प्रिय XXX

बरेच दिवस झाले... किनार्यावर गेलोच नाही...अगोदर जायचो...उभा राहायचो बराच वेळ क्षितिजावर नजर रोखून...मनातल्या मनात ओरडून स्वत:लाच प्रश्न विचारायचो...आणि स्वत:च निरुत्तर व्हायचो! किनार्यावरच्या गर्दीत, उसळणार्या लाटांच्या आवाजात एकांत अनुभवायचो....तेव्हा सागराच्या विशालतेसमोर माझा एकांत क्षुद्र वाटायचा....आणि मग बराच वेळा नंतर, सूर्य बुडून गेल्यावर मन हलकं व्हायचं! 

पण तू आयुष्यात आल्यापासून एकटेपणा काय असतो तेच विसरलोय बहुधा! म्हणूनच कि काय समुद्र किनार्याची साधी आठवण देखील आली नाही मागच्या काही महिन्यात! बहुधा त्या मनात कोंडलेल्या प्रश्नाचं तूच उत्तर होतेस, जे आजवर मी शोधत होतो!
आज किनार्यावर जावसं वाटतंय...तुझ्यासोबत!
मस्त हातात हात घेऊन, किनारा संपेपर्यंत, दोघांच्या पावलांचे ठसे वाळूवर अलगद उमटवत चालत रहावस वाटतंय! तुझ्या स्पर्शासोबत आज जाणवून घ्यायचेत ते लाटांचे स्पर्श...अनुभवायची आहे ती गर्दी...भिजून जायचंय तुझ्यासोबत...त्या उसळणार्या लाटांमध्ये!
येशील का कधी माझ्यासोबत...किनार्यावर..!

तुझाच,

ABC

आम आदमी

आम आदमी-अरविंद केजरीवाल यांची अवस्था बघून सुचलेल्या ओळी..

भुंकती श्वान त्वेषाने, आवाज क्षीण झाला...

शब्दांत आज त्याच्या, ती धार राहिली नाही!

पोटात आग झाली, मीडियाची मुक्ताफळे,

भाजून घेती भाकरी, त्यांना लाज राहिली नाही!

महेश

महादू

मिरगाचा पह्यलाच पाउस निब्बर पडला... वडा पह्य्ल्याच पावसात वाहून गेला..रानात चांगला वापसा झालेला...वल खोलवर गेली...पेरणीचा मोसम सुरु झाला...महादू अन त्याचा तरणाबांड पोरगा नागू पेरणीच्या तयारीला लागले..

राज्या बाज्या गाडीला जुपले...राज्या थोडा आता थकला होता....महादूच्या रानात अशा कित्येक पेरण्या आपल्या खांद्यावर त्यानं पार पाडल्या होत्या... बाज्या अजून नवीन खोंड होतं...तिफन, जू, दांडी, कासरा, चाबूक, झोळी, बी, खात अन दुपारच्या भाकरी बैलगाडीत घालून निघाले रानाकड...
नागूनं तंबाकू मळली अन थोबाड उघडून चिमुट मध्ये सरकवत बोलला,
“आज दोन एकरचा फड कसं बी करून पेरूनच काडू..”
महादू आपला वाटेने जाताना लोकांनी काय पेरलय काय नाय बघत होता.

बाभळीच्या झाडाखाली गाडी सोडली. जू, दांडी, तिफन जुपली. तीफनीचे नळ व्यवस्थित लावले. येसन अन कासरा तपासून बघितला..
नागूनं एका झोळीत सोयाबीनच बी काढलं अन दुसर्या झोळीत खात काढला. खताची झोळी महादूच्या गळ्यात अडकवली, अन बियाची झोळी स्वत:च्या गळ्यात अडकवली.

रानात नळ खुपसले, पुढे नागू तिफन घेऊन मागे महादू खताचे नळ घेऊन...ओंजळीत बी आणि खात घेतला...नागूनं चाबूक उगारला...”हर्र्र्रर्र...चल राज्यां...बाज्या....” तिफन हलली...पहिलं मुरडण पडलं.
बी चांगलं पडत होतं. एका पाठोपाठ एक मुरडण येऊ लागलं. राज्या बाज्या जोर लावून तिफन वडू लागले. दुपार होईपर्यंत अर्ध रान पेरून निघालं.

पुढचं मुरडण अर्ध आलं, अन नेमक राज्यानं मान टाकली, अन बैल जाग्यावर बसलं. तीफनीचा जू निसटला, कासरा सुटला. तिफन थांबली. नागूनं चाबूक उचलला अन राज्याच्या पाठीवर तीन चार वळ उमटले...
“ह्र्रर्र्र्र...उठ...हर्र्र्रर्र..उठ...राज्या..” एकावर एक वळ उठू लागले...बैल काय उठायला तयार नाही...
“आं राज्या....तुझ्यातर आईचा...xxxxxxx” शिव्यावर शिव्या अन वळावर वळ उठू लागले.

महादूने गळ्यातली झोळी सोडली.
“अर्र भुकेजल असन ते, सकाळधरून जुप्लाय...थकल असन ते..” महादू.

“ह्याच्या आयला....ह्याला काय झालं थकायला..दोन टायमाला खापरी पेंड, आमून अन जवारीचा कडबा हाय कि खाद्गीला...” नागू...

“ह्र्रर्र्र्र...उठ...हर्र्र्रर्र..उठ...राज्या..” कातडी वर वळ दिसू लागले. महादूचा जीव तुटू लागला. नागुला जेवढ प्रेमानं संभाळल होता तेवढाच प्रेमाने त्यानं बैलाला संभाळल होता.

“आर त्यला बसू दे कि थोडायेळ...काय जीव घेतो का त्याचा? गवत खावून पोट-बीट दुखत असन तेचं..” महादू.

“सतरा बर्या सांगितलं व्हतं नवं बैल घिऊ ह्या पेरणीला...असलं म्हातारं जीत्राप घिऊन निघाले पेरायला...आता घी ह्याला उरावर...” चाबूक काय थांबत नव्हता.
“उद्याच मूरडच्या बाजारात न्हीउन खटकाची भरती करून टाकतो...ह्याच्या मायला ह्याच्या...”

महादुला वाईट वाटलं. बैलाच्या पाठीवरचा प्रत्येक वळ त्याला स्वत:च्या पाठीवर बसल्यासारखा वाटत होता. तळमळ सहन होईना.
बैलाच्या जवळ जावून पोटाला हात लावून बघितल. बैल केविलवाण्या नजरेने त्याच्याकड बघू लागलं.

महादूनं जोडा घातला, अन तडक गावाकड निघाला. जावून जनावराच्या डॉक्टरला सगळी हकीकत सांगितली. डॉक्टर ने दोन गोळ्या दिल्या.

नागूने तोवर चाबकाने बैलाची पाठ सोलून काढली. बैल काय जाग्यावरून उठलं नाही. शेवटी वैतागून भाकरी सोडली. पोटभर खावून झाडाखाली लोटून दिलं.

तोवर महादू आला, त्याच्या उरलेल्या भाकरीत गोळी घालून राज्याला खावू घातली. ओंजळीत पाणी घेऊन त्याला पाजलं.

त्याच्या पाठीवरून हात फिरवला. कातडी सरसरली. चाबकाचे वळ बघून महादूचा जीव खालावला. डोळ्यातून पाणी आलं.

नागू उठला. उठताच बैलाला अन महादूला दोन चार शिव्या हासडल्या. महादू निपचित बैलाजवळच बसून होता.

थोड्या वेळाने बैल, खेकरून पायाने जमीन उकरू लागलं. महादूने ओळखलं..पोट दुखत होतं त्याचं.
बैल जागेवरच पातळ हाग्ल. थोडावेळ बसलं अन मग अंगात तरतरी आल्यागत ताडकन उठलं. स्वत:च मान खाली घालून जू मानेवर घेतला अन नागूकड बघत उभं राहिलं.

आदत

तुम्हारी आदत हुई है या दुनिया से नफरत पता नहीं।
तुम्हे छोड़ दू या दुनिया, बात तो एक ही है।

राह

रोज तुम्हारी राह देखकर थक गये है हम,
सोचते है अब राह देखने का एक मौका तुम्हे भी दे दें..जिंदगीभर के लिए।