Mann Maze

Mann Maze

...


दिवस मावळतीला झुकतो...मी एक पेन आणि कागद घेऊन काहीतरी लिहिण्यासाठी म्हणून समुद्राच्या किनाऱ्यावर जातो. वाळूमध्ये पाय रोवून त्या अथांग सागराकडे पाहतो. हजारो मैलांचा प्रवास करुण आलेल्या त्या लाटांना माझ्या पायाशी येऊन संपताना पाहतो...मग उद्विग्न होऊन चालत राहतो किनाऱ्यावर...कित्येक लाटा येतात, जातात. मग विचार येतो, ज्या लाटा किनाऱ्याच्या भेटीसाठी एवढा दूरचा प्रवास करुण येतात, ज्या ओढीने येतात, त्यांची भेट फक्त काही क्षणांची?
पुन्हा किती काळ त्या लहरींना किनाऱ्याच्या शोधात भटकावे लागेल? किती अंतर चालावे लागेल? किती वादळांचा सामना करावा लागेल?
कसलं हे प्रेम? कसली हि आसक्ती? कसली हि ओढ मिलनाची?
किती हा संयम?

आणि मी, तू मागच्या काही दिवसात भेटली नाहीस तर पुरता ढासळून गेलोय...एवढाहि संयम माझ्याकडे नसावा?
कसा असेल संयम, तू ओढच तशी लावलीस नां....

शब्द कागदावर उतरवण्या पूर्वीच सूर्य बुडतो...अंधार होतो...आणि मी काहीही न लिहिता परततो... नेहमी सारखाच!

भरारी


एक गरुड....
भर उन्हाळ्यात...
दाणा-पाणी शोधत..
सैरभैर उडताना...

सापडतो एखाद्या वावटळीत...
दिशाहीन होतो...
दोन्ही पंखातले बळ त्या वाऱ्याचा विरोध करण्यासाठी अपुरे पडू लागते...
त्या सुसाट वावटळीतून बाहेर पडण्यासाठी जीव तोडून धडपड करतो, आणि तेवढेच खोलवर अडकत जातो, वाऱ्यासोबत चक्रावून जातो, वाऱ्यासोबत उडालेल्या पाला-पाचोळ्यात त्याच्या जीवाचे प्रचंड हाल होतात, तीक्ष्ण असलेली त्याची नजर अचानक धुसर होऊ लागते. तरीही, प्रयत्नांची शिकस्त करुण तो लढत राहतो त्या वादळाशी! अगदी शेवटपर्यंत!
शेवटी वावटळच थांबते! घायाळ, दिशाहीन झालेला तो गरुड, पुन्हा तयार होतो, एका नव्या वादळाला सामोरे जाण्यासाठी! पुन्हा तेच बळ घेऊन, आणि तीच तीक्ष्ण नजर घेऊन, घेतो भरारी! उंचच उंच!

महेश.

विध्वंस या मनाचा


ढग दाटून आल्यावर
माझ्या मनात काहूर उठते
सुसाट वाऱ्या सम ते
सैरावैरा धावत सुटते

माझ्या वेदना पाहून
ते ढगही गरजतात
माझे सांत्वन करताना
माझ्याच डोळ्यांतून बरसतात

अतिवृष्टी झाल्याने
नदीला पूर येतो
पाला-पाचोळ्यागत...
मी दूर वाहून जातो...

आठवणी मुरतात खोलवर..
जरी पाउस हा क्षणांचा
कोण थांबवू शकेल आता
विध्वंस या मनाचा?
महेश.

"हायब्रीड बेनं"


मागल्या साली, म्या गणपाला (माझा गावाकडला शेतकरी दोस्त) इचारलं..."भावा, सगळ्यात फालतू अन दुप्लीकेत "हायब्रीड बेनं" कोणतं हाय रं सध्या?"
गणपा: राहुल गांधी.
म्या अवाक!!
मग पुढ बोलला: "आज्जी कोण, आजोबा कोण, बाप कोण माय कोण? कुणाचं नाव लाव्त्यात, कुणाची जात लाव्त्यात? कोणत्या देशातले हायत, कोणत्या देश्यात राहत्यात? एवढं फालतू हायब्रीड बेनं आजून दुसरं म्या त न्हाय बा बगितलं!"

बोंबला...

...


शुरू कहा से करना ये तो सब जानते है..
सिकंदर तो वही है जिसे कहा रुकना पता है!

माही.

चाफा आणि माझे मन...


चाफा आणि माझे मन...
यांची नेहमीच फसगत होते...
तो काही बोलत नाही
अन माझ्या मनातले कुणी ऐकत नाही!

मग मी चाफ्याशीच बोलतो..
त्याच्या वेदना समजून घेतो..
अन माझ्या मनातले
तो पण शांतपणे ऐकून घेतो!

मग तो पण ऐन पावसाळ्यात
आपली पाने झाडून टाकतो..
अन मी पण त्या थेंबांमध्ये
दोन चार थेंबांची भर घालतो...

मग चाफा पण सुकतो...
अन माझे डोळे पण सुकतात...
त्याच्या सुगंधाला अन माझ्या हास्याला..
सारेच जन काही दिवस मुकतात!

ऋतूमागून ऋतू जातात...
चाफा पुन्हा फुलतो-सुकतो...
नाहीच कुणी ऐकून घेणारा मिळाला
तर मी पुन्हा, माझ्या मनाशीच बोलतो!

महेश.

...


रात के अँधेरे में हमें रोशनी न मिली
किसी से कोई शिकवा, कोई गिला नहीं!
गर्दिश में तारे तो हजारे देखे हमने...
पर हमारे दिल की पुकार सुननेवाला कोई मिला नहीं!

महेश.

एक मजेशीर किस्सा.


मुरुड, लातूर-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर मागील २० वर्षापासून तालुका होता होता राहिलेले एक शहर वजा गाव. माझे बालवाडी ते १२ वी शिक्षण तेथेच झाले. मी १२ वीत असतानाचा एक किस्सा.
पावसाळा सुरु होता. मुरुड गावात डुकरांचा अगदी सूळसुळाट झाला होता. आम्ही मुरूडच्या त्या काळच्या (आणि आत्ताही) एकदम उच्चभ्रू समजल्या जाणार्या भागात राहत होतो. पण तो भागही त्या डुकरांनी सोडला नव्हता. डुकरांच्या टोळ्याच टोळ्या अख्या गावात धुमाकूळ घालत होत्या. नागरिक, दुकानदार, व्यापारी सर्वजण अगदी त्रासून गेले होते.
मुरुड गाव सुधारले असल्याने बहुतेक लोकांच्या घरी शौचालय बांधण्यात आले होते. आणि त्यामुळे उघड्यावर शौचास जाणारांची संख्या अगदीच कमी झाली होती. त्यामुळे डुकरांना त्यांच्या मुलभूत अन्नाची कमतरता पडू लागली असावी. शिवाय त्यात पावसाळा, पावसाने गावातली सगळी घाण वाहून गेलेली. त्यामुळे डुकरांचे भयंकर हाल होत असावेत. मग काय, डुकरे कधी कुणाच्या घरात शिरू लागली तर कधी कुणाच्या दुकानात!

एके दिवशी आमच्या भागात राहणारी एक मारवाडी महिला बाजारातून सामान खरेदी करून पायी चालत होती. तिच्याकडे सामानाने भरलेल्या २ पिशव्या होत्या. एका पिशवीत चुरमुरे होते. अन एका पिशवीत किरकोळ सामान.
बाई रस्त्याने चालत होत्या. डुकरांची एक टोळी आपल्या म्होरक्यासकट रस्त्याच्या कडेला दबा धरून बसली होती. मोका मिळताच टोळीच्या म्होरक्याने बाईवर हल्ला केला. चुरमुर्याची पिशवी तोंडात घेतली. बाई पुरती घाबरली. डुक्कर पिशवी ओढू लागले, पण बाई काय पिशवी सोडेना. बाई मोठ्याने ओरडू लागली, अन डुक्कर पण ओरडून त्याच्या साथीदारांना बोलावू लागले. त्यांच्या झटापटीत पिशवी फाटली. चुरमुरे रस्त्यावर सांडले. अन ते पाहताच डुकरांच्या टोळीने हल्लाबोल केला. बाई तूर्तास घाबरली, अन तिथून चालती झाली. डुकरांनी चुरमुर्यावर मस्त ताव हाणला.
दुसर्या दिवशी बाईने रागारागात ग्राम पंचायतीवर केस ठोकली का पंचायत समिती कडे तक्रार केली, असे काहीसे झाले. ४-५ दिवसात डुक्कर पकडणारी एक विशिष्ट जमात असते, त्यांना पंचायतीने डुकरे पकडण्याचे कंत्राट दिले.
अवघ्या १०-१२ दिवसात शेकडो डुकरे पकडली गेली. एक ट्रक भरून ती डुकरे मुंबईला पाठवण्यात आली असे काही विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
अशाप्रकारे त्या डुकरांच्या टोळ्या नंतर मुंबईतील मौंसप्रेमींच्या भक्षस्थानी पडल्या.

..

मागच्या काही दिवसांपासून पावसाच्या थेंबांसोबत शब्दही हरवल्या सारखे वाटत आहे...काहीतरी लिहायला म्हणून बसतो...अन मग निराश होऊन जातो.

आज उभा मी शिखरावर..


दुनियेने हिणवले....
आपल्यांनी हाकलले....
माझ्या मनगटातील बळ...
शेवटी माझ्या मीच जाणले....

हवी होती फक्त...
एक साद धीराची...
मग कशाला परवा
या खोट्या दुनियेची?

धीर समजलो ज्या हाकेला
तो केवळ आवाज निघाला...
झाला भ्रमनिरास तेव्हा..
लागला घोर जीवाला..

लढलो एकटाच शेवटी
मोडक्या तलवारीने,...
झेलली वादळे सारी...
निगरगट्ट मनाने!

आज उभा मी शिखरावर...
पाहतो त्यांना पायथ्याशी...
माझ्या यशाचे श्रेय...
परी त्यांच्या माथ्याशी!

महेश.

कीड


एका गावात गोपाल नावाचा मनुष्य राहत असतो. तो एक रोपटे लावतो. मग रोपटे हळू हळू मोठे होते, फांद्या फुटतात. बरेच उन्हाळे-पावसाळे सहन करत झाड उभे असते. मग अचानक झाडाला वाळवी लागते. वाळवी बुडातून वर वर चढत जाते, आणि एक एक फांदी पोखरू लागते. मग एक एक फांदी वाळायला लगते.गोपाल ला ती वाळवी दिसत नाही. मग तो वाळलेल्या फांदीला पाणी घालतो. पण फांदी काही हिरवी होत नाही. मग रागारागात तो ती फांदीच तोडून टाकतो. काही फांद्या आपोआपच त्या वाळवीमुळे सुकून गळून पडतात. पण गोपाळच्या लक्षात शेवटपर्यंत ते येत नाही. अशा रीतीने वाळवी एवढी पसरते कि शेवटी झाडच मोडकळीस येते.

तात्पर्य: केव्हाही कीड लागली कि त्याचे मूळ शोधावे, अन मुळासकट कीड नष्ट करावी.

© Copy Rights Reserved to the author!

"पाणी ढवळून डुक्कर फरार!"


मी तयार केलेली एक मराठी म्हण व त्यावर आधारित गोष्ट.
"पाणी ढवळून डुक्कर फरार!"

एक सुंदर जंगल असते. त्यात खूप सारे प्राणी अगदी मजेत राहत असतात. त्या जंगलाची आव तिथल्या आनंदी वातावरणाची बातमी सर्वार्दूर पसरते. मग इतरही बरचसे प्राणी त्या जंगलाकडे आकर्षित होतात व त्या जंगलातील प्राण्यांमध्ये सामील होतात. त्या जंगलात एक तलाव असतो जेथे बरेचसे प्राणी पाणी पिण्याच्या निमित्ताने येत असत व थोडा वेळ गप्पा मारून निघून जात असत. एके दिवशी असेच त्या तलावावर काही प्राणी पाणी पीत असताना तेथे एक रानडुक्कर येते आणि पाण्यात उडी घेऊन मनसोक्त पाणी ढवळून टाकते. काही प्राणी त्याला तसे न करण्यासाठी उपदेश करतात पण तो मस्तीत आलेला रानडुक्कर काही न ऐकता तसेच पाण्यात लोळत राहतो. शिवाय त्या डुकरासोबतच बाहेरून आलेले काही प्राणी त्या डुकराला प्रोत्साहित करत राहतात. पूर्ण पाणी गढूळ होऊन जाते. मग गढूळ पाणी पिण्यास अयोग्य झाल्याने हळू हळू एक एक प्राणी ते आनंदी जंगल सोडून जाऊ लागतो. तलाव भकास होऊन जातो. पाणी ढवळून रान-डुक्कर व त्याचे साथीदार मात्र फरार होतात!

मतितार्थ: आपल्या समूहात, मित्रवर्गात जेव्हा एखादी त्रयस्थ व्यक्ती येऊन ढवळाढवळ करते तेव्हा त्याला वेळीच चोप द्या, अन्यथा आपली नाती बिघडवून तो त्रयस्थ केव्हा फरार होईल सांगता येत नाही.

(वरील गोष्टीचा आणि गोष्टीत उल्लेखलेल्या नावांचा कुठल्याही वास्तविक गोष्टीशी, जीवित अथवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाहीये. निव्वळ काल्पनिक गोष्ट आहे. काही संबंध आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा!)

© All Copy Rights Reserved to the author!