Mann Maze
मै और तू...
रानफुल आणि मकरंद.
पाहतो मागे वळून..
दोन कप दुध...
पहाटच्या पारी देवीच्या देवळात काकड आरतीची घंटी वाजली. पडवीला बाजावर झोपलेलं म्हातारं खडबडून जागं झालं. हातरुनाच्या घड्या घालून, घोंगडं पांघरून, एका चरवीत पाणी घेऊन घराबाहीर आलं. थंडीनं गाव गारठून गेलेलं. दाट धुक्यातून रस्ता काढीत जनावराच्या गोठ्या पुढं येऊन जरा बसलं.आजू बाजूचा पालापाचुळा गोळा केला. फाटक्या सदऱ्याच्या खिशातून माचीस काढून शेकोटी पेटीवली. थोडं तापून झाल्यावर खिशातून एक बिडी काढून एक जळक्या काडी घेऊन बिडी शिलगावली. धुराचे धुरके सोडत देवीची काकड आरती ऐकत बसलं.
घरी एक दुभती म्हैस. म्हाताऱ्यानं पै पै जमा करून पाच वर्षापूर्वी हाळीच्या बाजारातून पहिल्या येताची म्हैस आणली होती . महिना भरा पूर्वी येलेली. एक रेडकू कपाळावर चंद्र घेऊन ऐन पौर्णिमेला जन्मलेलं. म्हैस दुधाची होती. रोज चरवीभरून दुध निघायचं.
शेजारच्या धोंडीबाचं कोंबडं बेंबीच्या देठातून कर्कस वरडलं . तांबडं फुटलं. म्हातारं बिगीनं उठलं. चरवी घेतली अन धार काढायला निघालं. मेकीला बांधलेलं रेडकू जीव तोडून दुध पिण्यासाठी वरडू लागलं. त्याचं खापाडीला गेलेलं पोट बघून म्हाताऱ्याला कसंतरीच झालं. म्हाताऱ्यान रेडकू सोडलं तसं रेडकू उड्या मारत म्हशीजवळगेलं अन म्हशीच्या कासात ढुसण्या हाणू लागलं. म्हसर रेडकाला चाटू लागलं. बघता बघता म्हशीनं पान्हा सोडला. म्हाताऱ्यान रेडकू आखडून मेकीला नेऊन बांधलं.
चरवीतल्या पाण्यानं म्हशीची कास धुतली. अन धारा काढायला बसलं. मेकीला बांधलेलं रेडकू पुन्हा वरडू लागलं. म्हातारं म्हशीची थानं धरून पिळू लागलं. पण रेडकाच्या आवाजानं म्हाताऱ्याचं काळीज दुखाया लागलं. चरवी भरत आली. मग न राहवून म्हाताऱ्यानं म्हशीच्या थानात थोडं दुध सोडलं अन रेडकाला दुध प्यायला मोकळं सोडलं. रेडकू चीटून दुध पिऊ लागलं. म्हातारं जरा वेळ तसच बघत राहिलं. त्याला त्या रेडकाला बघून त्याच्या पोराची लहान असतानाची आठवण आली. रेडकाचं भरलेलं पोट बघून मग काळीज थोडं हलकं झालं.
दुधाची चरवी घिऊन घरी गेलं. सुनबाई अजून उठली नव्हती. सैपाक घरात चरवी ठेवली.
अंघोळ आष्टी करून, धोतर पिळून वळणीवर वाळत टाकलं. काल धुतलेलं धोतर अन सदरा अंगावर चढवून पडवीला येऊन हरिपाठ म्हणत बसलं. तोवर सुनबाईने उठून घराची झाडाझुडी केली, दारात सडा टाकून रांगोळी घातली.
हरिपाठ म्हणून झाल्यावर म्हातारं चहाची वाट बघत बसलं. सूनबाईने दुधाची चरवी बघितली. दोन कप दुध कमी दिसत होतं. सुनबाईनं तिच्या धन्याला बोलावून घेतलं.
"तुम्हाला कितींदा सांगितलं, एखादा गडी ठिवा म्हैस राखायला म्हणून. पण माझं कोण ऐकतंय इथं?"
धन्यान लाडानं इचारलं,"काय झालं?"
"रोज दोन कप दुध कमी येतंय. मला वाटतंय म्हातारं धार काढून येता येता दुध पीतय." सुनबाई.
रेडकू वरडताना जेवढं दुखलं नव्हतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं भयानक कळ म्हाताऱ्याच्या काळजात उठली. गपचूप उठून घरा बाहीर पडलं अन देवीच्या देवळाकड चालायला लागलं!
तोंडात अजून हरिपाठाची गुणगुण सुरूच होती. "हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा....पुण्याची गणना कोण करी...."
महेश.
तुझे माझे नाते....
किती ऋतू येऊन गेले....पण....
वाटतंय मलाही आता....
एकटा ...
कठीण समय येता..
असंच!
पाटीलकी
राजे गेले...अन..
पाटीलकी बी गेली...
निजामाच्या जाचात
सगळी लुटालूट झाली..!
राझाकाराच्या गोळीबारात
म्हातारं बी गेलं...
७२ च्या दुष्काळात..
पचास जनावर मेलं...!
सिलिंगच्या कायद्यात
जमिनीला कुळ लागलं!
मुठभर पिकात तवा..
कसंबसं भागलं...!
९३ च्या भूकंपात
चीरबंदी वाडा बोकांडी घिऊन
म्हातारी बी जिरली...
येणाऱ्या-जाणार्या पावण्याला बसाया....
ढाळज तेवढी उरली..
आरक्षणाच्या तलवारीनं
लेकराच्या शिक्षणाचा गळा कापला...
मिरीटमदी यिऊनबी..
कुणी घेतला न्हाई दाखला...
आता धाकलं राखतंय म्हशी
अन थोरलं करतंय गुलामी(नौकरी)
डोळ्यादेखत सम्द्याच्या..
पाटीलकी लागली निलामी!
महेश
३/१०/२०११
असंच!
असंच!
आबाळ..

का हाळजावी पिलावळ.....
पोट भरता भरता....
तान्ह्या जीवाची तारांबळ...
नाही रहाया छपर....
नाही खायला भाकर...
का देवाच्या माथी उगा...
मग फोडतो खापर?
असल रक्तात रिग...
कर लेकरांचा सांभाळ.....
लेकरा संग मायीची
अगा कशाला आबाळ?
तुझ्या जुलमी हवसीची....
साऱ्या संसाराला झळ...
जखमा उरात...
लेकरांच्या जलमभर!
असंच!
गारा होऊन तुझ्या अंगणात बरसून जावं!
तुझ्या नाजूक तळहातानी...
मला अलगद झेलून घ्यावं!
तुझ्या ओठांवर विरघळून मग....
माझं आयुष्य संपून जावं!
महेश.
असंच!
कधी कधी खूप काही लिहावसं वाटतं!
पण नेमकी तुझी आठवण येते अन शब्दच हरवून जातात!
कधी कधी खूप ठरवतो...आता लिखाण बंद करावं म्हणून!
पण मग पुन्हा तुझीच आठवण येते आणि मग शब्द अवकाळी पावसातल्या गारांसारखे बरसू लागतात!
जेव्हा तुझ्या अंगणात गारा पडतील....दो-चार गारा तळहातावर घे...अन विरघळून जाईपर्यंत पाहत रहा....कदाचित तुलाही कुणाची तरी आठवण येयील!
असंच!
ऐन मोसमात जसे...
नदीला उधाण यावे...
अन सागराच्या मिठीतच
तिने शांत व्हावे...
असे घडावे अवचित काही...
तुला माझ्या मनीचे गुज कळावे...
ऐन विरहाच्या रात्री...
तू मला येऊन बिलगावे!
असंच!
पौर्णिमेच्या मध्यरात्री...
पाण्यात चंद्रबिंब पाहतो....
तुझ्या आठवणीत हा वेडा,...
रात्रभर चांदण्यात नाहतो!
पुन्हा एक...कविता लिहितो मी!
पौर्णिमेच्या रात्री जेव्हा....
सागरास भरती येते
धुंद लाटांसोबत....
एकटाच बोलत बसतो मी....
सूर्य मावळतीला झुकतो...
अन पाखरे घरट्यात निजतात....
रात्रीच्या भयाण अंधारात...
मलाच मग शोधतो मी...
सुसाट वारा सुटतो...
अन ढगही गर्जना करतात...
त्या अवकाळी पावसात...
मनसोक्त मग भिजतो मी...
शिशिराच्या दाट धुक्यात...
तुझी वाट पाहतो मी...
अन तुझ्या पुसट पाठमोऱ्या प्रतिमेवर...
पुन्हा एक...कविता लिहितो मी!
महेश.
